Ötzi the Iceman | ‘ओत्झी द आईसमॅन’च्या शरीरावर ५,३०० वर्षे जुन्या ‘यीस्ट’चा शोध  
विश्वसंचार

Ötzi the Iceman | ‘ओत्झी द आईसमॅन’च्या शरीरावर ५,३०० वर्षे जुन्या ‘यीस्ट’चा शोध

प्राचीन घटकापासून बनवता येणार चविष्ट ब्रेड!

पुढारी वृत्तसेवा

रोम : सुमारे ५,३०० वर्षांपूर्वी हत्या झालेल्या ‘ओत्झी द आईसमॅन’ या प्रसिद्ध हिममानवाच्या शरीरावर आणि पोटात मोठ्या प्रमाणावर ‘यीस्ट’ (Yeasts - किण्व) आढळले आहे. विशेष म्हणजे, यातील काही यीस्ट अजूनही जिवंत आणि सक्रिय असण्याची शक्यता एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. ३ जून रोजी ‘मायक्रोबायोम’ या वैज्ञानिक नियतकालिकात हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

इ.स. १९९१ मध्ये इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवरील आल्प्स पर्वतावर ओत्झीचा गोठलेला ममीफाईड मृतदेह सापडला होता. संशोधकांनुसार, ओत्झीच्या हत्येनंतर लगेचच या यीस्टने त्याच्या शरीरात प्रवेश केला होता. हे यीस्ट आल्प्सच्या ग्लेशियर्समधील (हिमनद्या) थंड वातावरणाशी जुळवून घेणारे आहे. मृतदेह सापडल्यानंतर त्याला प्रयोगशाळेत उणे ६ अंश सेल्सिअस (२१ अंश फॅरेनहाईट) इतक्या गोठवणाऱ्या तापमानात ठेवण्यात आले आहे. मात्र, इतक्या कडक थंडीतही या यीस्टच्या बीजाणूंनी (Spores) ओत्झीच्या मृतदेहावर आपली वाढ कायम ठेवली आहे. या संशोधनातील सर्वात रंजक बाब म्हणजे, यातील काही यीस्टचा वापर ब्रेड बेकिंगसाठी केला जाऊ शकतो. प्राथमिक चाचणीदरम्यान शास्त्रज्ञांनी या यीस्टचा वापर करून ‘सावरडो’ (Sourdough - एक प्रकारचा ब्रेड) बनवण्याचा प्रयोग केला, जो यशस्वी ठरला. ‘हा प्रयोग यशस्वी झाला.

या यीस्टपासून बनवलेले कणीक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होते,’ अशी माहिती इटलीतील ‘युराक रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ममी स्टडीज’चे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मोहम्मद सरहान यांनी दिली. भविष्यात बेकिंग आणि बिअर बनवणाऱ्या फरमेंटेशन (आंबवण) उद्योगांमध्ये या प्राचीन यीस्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो, असेही सरहान यांनी सांगितले. ओत्झीच्या मृतदेहावर केवळ प्राचीनच नव्हे, तर आधुनिक काळातील सूक्ष्मजीवदेखील आढळले आहेत. मृतदेहाच्या जतनासाठी केलेल्या प्रयत्नांदरम्यान हे आधुनिक जंतू अनावधानाने तिथे पोहोचले असावेत. आता शास्त्रज्ञांसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, हे आधुनिक सूक्ष्मजीव आणि प्राचीन यीस्ट मिळून ओत्झीच्या मृतदेहाचे नुकसान तर करत नाहीत ना? यावर अद्याप स्पष्टता आलेली नसून, या हिममानवाचा मृतदेह दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी आता यावर पुढील संशोधन करणे गरजेचे असल्याचे मोहम्मद सरहान यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT