बोल्झानो : सुमारे 5,300 वर्षांपूर्वी इटालियन आल्प्सच्या पर्वतरांगांमध्ये रहस्यमय परिस्थितीत हत्या झालेल्या ‘ओत्झी द आइसमॅन’बद्दल जगाला प्रचंड कुतूहल आहे. आता, एका नवीन डीएनए विश्लेषणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओत्झी ज्या काळात आणि ज्या परिसरात राहत होता, तेथील इतर लोकांपेक्षा त्याची वंशपरंपरा लक्षणीयरीत्या वेगळी होती. या शोधामुळे ताम्रयुगातील सामाजिक रचनेवर नवीन प्रकाश पडला आहे.
’नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी ओत्झीच्या काळातील इतर 15 व्यक्तींच्या प्राचीन डीएनएचा अभ्यास केला. या अभ्यासातून असे दिसून आले की, जरी ओत्झी आणि त्याचे शेजारी यांच्यात जनुकीय पातळीवर बरेच साम्य असले तरी, त्यांच्या वंशवेलीत, विशेषतः पितृवंशात (वडिलांकडून आलेल्या वंशपरंपरेत) मोठे अंतर होते.
इटलीतील बोल्झानो येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर ममी स्टडीज’च्या संशोधक व्हॅलेंटीना कोइया यांनी सांगितले, ‘आम्ही ताम्रयुगातील अतिरिक्त 15 व्यक्तींच्या डीएनएचे विश्लेषण केले आणि त्यांची एकूण जनुकीय रचना आइसमॅनसारखीच असल्याचे आढळले; पण जेव्हा आम्ही वंशपरंपरेचा अधिक बारकाईने अभ्यास केला, तेव्हा आम्हाला आढळले की ओत्झीचा वंश त्या परिसरातील इतर नमुन्यांपेक्षा वेगळा होता.’ या अभ्यासासाठी, संशोधकांनी मेसोलिथिक ते मध्य कांस्ययुगापर्यंत (सुमारे इ.स.पू. 6400 ते 1300) टायरोलियन आल्प्समध्ये राहणार्या 47 लोकांच्या जीनोमचे विश्लेषण केले. 1991 मध्ये गिर्यारोहकांना सापडलेला ओत्झीचा ममी बनलेला मृतदेह या अभ्यासाचा केंद्रबिंदू होता.