Ancient Arrows | नॉर्वेमधील वेगाने वितळणाऱ्या बर्फात सापडले ५ ते ६ हजार वर्षे जुने बाण! 
विश्वसंचार

Ancient Arrows | नॉर्वेमधील वेगाने वितळणाऱ्या बर्फात सापडले ५ ते ६ हजार वर्षे जुने बाण!

पुढारी वृत्तसेवा

ओस्लो : हवामान बदलामुळे जगभरातील ग्‍लेशियर आणि बर्फाच्छादित प्रदेश वेगाने वितळत आहेत, ज्याचे परिणाम अत्यंत गंभीर ठरत आहेत. मात्र, याच वितळणाऱ्या बर्फाखाली लपलेला एक प्राचीन इतिहास आता संशोधकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे. नॉर्वेच्या पर्वतीय प्रदेशात शास्त्रज्ञांना ४८ प्रागैतिहासिक बाण सापडले असून, त्यातील एक बाण तब्बल ५,००० ते ६,००० वर्षे जुना असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

‘सीक्रेटस्‌ ऑफ द आईस' मोहिमेचे मोठे यश

नॉर्वेच्या दक्षिणेकडील ओस्लोपासून सुमारे २०० मैलांवर असलेल्या जोतुनहाइमेन पर्वतरांगांमध्ये शास्त्रज्ञांनी नुकतीच मोहीम राबवली. 'सीक्रेटस्‌ ऑफ द आईस' या जगातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांतर्गत मागील २० वर्षांपासून येथे संशोधन सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत ७३ हून अधिक ऐतिहासिक ठिकाणांहून ५,००० हून अधिक वस्तू शोधून काढण्यात आल्या आहेत. यामध्ये हरणाच्‍या शिकारीची उपकरणे, कपडे, ३,४०० वर्षे जुना चामड्याचा बूट आणि जगातील सर्वात जुनी अखंड लाकडी स्की यांचा समावेश आहे. बर्फाच्या अतिथंड आणि ऑक्सिजन नसलेल्या वातावरणामुळे जैविक वस्तू (लाकूड, कपडे इत्यादी) हजारो वर्षे सडण्यापासून सुरक्षित राहतात. मात्र, मानवनिर्मित हवामान बदलामुळे येथील प्राचीन बर्फ आता वेगाने वितळत असून, त्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष बाहेर येत आहेत.

स्लेट आणि शिंपल्यापासून बनवलेले बाण

या उन्हाळ्यात संशोधकांनी लँगफॉन्ने, स्टोर्फोन्ने आणि हँडक्लेफोन्ने हिमनद्यांच्या परिसराचा अभ्यास केला. यात सापडलेल्या वस्तूंमध्ये सर्वात जुना बाण आहे. उत्तम दर्जाच्या दगडापासून बनवलेले बाणाचे टोक आणि त्याच्या दांड्याचे दोन भाग, जे सुमारे ५,००० ते ६,००० वर्षे जुने असल्याचे मानले जात आहे. इतर बाण हे गोड्या पाण्‍यातील शिंपल्यापासून बनवलेले आहेत. ते ३,६०० वर्षे जुने असल्‍याचे संशोधकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT