Israel Ancient stone tools | इस्रायलमध्ये सापडली 5 लाख वर्षे जुनी दगडी हत्यारे 
विश्वसंचार

Israel Ancient stone tools | इस्रायलमध्ये सापडली 5 लाख वर्षे जुनी दगडी हत्यारे

पुढारी वृत्तसेवा

तेल अवीव : इस्रायलमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी पाषाणयुगातील 10 अत्यंत दुर्मीळ कुर्‍हाडी (करपव रुशी) शोधून काढली आहेत. विशेष म्हणजे, ही हत्यारे बनवताना त्या काळातील मानवाने दगडातील नैसर्गिक जीवाश्म आणि स्फटिक यांचा कलात्मक वापर केल्याचे समोर आले आहे.

एका नवीन अभ्यासानुसार, ही हत्यारे साधारणपणे 5,00,000 ते 2,00,000 वर्षांपूर्वी ‘होमो इरेक्टस्’ या मानवी प्रजातीने बनवली असावीत. आपल्या पूर्वजांना या वस्तूंमध्ये काही अलौकिक किंवा वैश्विक शक्ती असल्याचे वाटत असावे, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. 17 मार्च रोजी ‘तेल अवीव’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. आतापर्यंत जगाच्या पाठीवर अशा प्रकारची जीवाश्मयुक्त हत्यारे केवळ एकटीच सापडली होती. मात्र, इस्रायलमधील साखनीन व्हॅली येथे प्रथमच अशा 10 कलात्मक कुर्‍हाडींचा संच सापडला आहे.

2024 आणि 2025 च्या दरम्यान स्थानिक रहिवासी मुआतझ शलाटा यांनी येथे काही सामान्य दगडी कुर्‍हाडी शोधल्या होत्या. शलाटा यांनी याची माहिती तेल अवीव विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक रान बरकाई यांना दिली. त्यानंतर 2025 मध्ये केलेल्या विशेष सर्वेक्षणात एकूण 200 हून अधिक कुर्‍हाडी सापडल्या, ज्यापैकी 10 कुर्‍हाडींवर विशेष भौगोलिक खुणा होत्या. या कुर्‍हाडींमध्ये छोट्या गुहांसारखी दिसणारी छिद्रे, गोलाकार लाटांसारखे आकार आणि दगडांमधील नैसर्गिक स्फटिक अतिशय कौशल्याने गुंफलेले आहेत. प्राध्यापक रान बरकाई यांनी सांगितले की, ‘हे शोध अद्वितीय आहेत; कारण आतापर्यंत अशा वस्तू कुठे तरी एखाद्याच सापडत होत्या.

एकाच भागात इतक्या मोठ्या प्रमाणात अशा वस्तू मिळणे हे यापूर्वी कधीही घडले नव्हते.’ आदिमानवाला नैसर्गिक भूगर्भीय वैशिष्ट्यांची किंवा जीवाश्मांची जाण होती का, की ही हत्यारे केवळ अपघाताने तशी बनली, यावर तज्ज्ञांमध्ये नेहमीच चर्चा असते. मात्र, एकाच ठिकाणी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू सापडल्यामुळे, हे आदिमानवाने जाणीवपूर्वक केलेले कृत्य असावे, या दाव्याला आता बळकटी मिळाली आहे. आदिमानव केवळ शिकारीसाठी हत्यारे बनवत नव्हता, तर त्याला सौंदर्याची आणि निसर्गाचीही जाण होती, हेच यातून सिद्ध होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT