कैरो : सिनाई वाळवंटात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना 5,000 वर्षे जुने एक दुर्मीळ ‘रॉक आर्ट’ (खडकावरील कोरीव काम) सापडले आहे. ही कलाकुसर प्राचीन इजिप्तने या प्रदेशावर मिळवलेला विजय आणि तिथल्या रहिवाशांवर केलेले क्रूर अत्याचार दर्शवते.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी दिलेल्या निवेदनानुसार, ही कलाकृती इजिप्शियन लोकांनी सिनाई प्रदेशावर कशा प्रकारे कब्जा मिळवला आणि स्थानिक लोकांना गुलाम बनवले, याचे भयावह चित्रण करते. खडकावर आढळलेल्या या द़ृश्यात : एक व्यक्ती विजयाच्या आनंदात आपले हात वर करून उभी आहे. दुसरी व्यक्ती गुडघ्यावर बसलेली असून, तिच्या छातीत बाण खुपसलेला आहे आणि हात मागे बांधलेले आहेत. जवळच एक नौका आणि ‘मिन’ या इजिप्शियन प्रजनन देवतेचा उल्लेख असलेला शिलालेख आहे, ज्यामध्ये त्याला ‘ताम्र क्षेत्राचा शासक’ म्हटले आहे.
संशोधकांच्या मते, इजिप्शियन लोकांनी सिनाईवर केवळ साम्राज्य विस्तारासाठी आक्रमण केले नव्हते, तर तिथल्या तांबे आणि फिरोजा सारख्या खनिज संपत्तीवर कब्जा मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. ‘हा रॉक पॅनेल दुसर्या प्रदेशावर वर्चस्व गाजवल्याच्या सर्वात जुन्या चित्रणांपैकी एक आहे,’ असे युनिव्हर्सिटी ऑफ बॉनचे इजिप्तॉलॉजीचे प्राध्यापक लुडविग मोरेन्झ यांनी सांगितले. या कलाकृतीमध्ये एक रंजक तपशील आढळला आहे. नौकेच्या चित्राजवळ एक शिलालेख होता, ज्यामध्ये कदाचित इजिप्शियन राजाचे नाव असावे.
मात्र, ते नाव मुद्दाम खोडून टाकण्यात आले आहे. हे नाव कोणी, कधी आणि का खोडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राचीन इजिप्तमध्ये सत्तांतर झाल्यावर जुन्या राजाचे नाव खोडण्याची पद्धत होती; पण येथेही तेच घडले का, याचा शोध सुरू आहे. इजिप्शियन पुरातत्त्व मंत्रालयाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ मुस्तफा नूर एल-दिन यांनी 2025 मध्ये केलेल्या सर्वेक्षणादरम्यान हा शोध लावला. हे संशोधन ‘ब्लॅटर अब्राहम्स’ या नियतकालिकाच्या 2025 च्या आवृत्तीत प्रकाशित झाले आहे.