पॅरिस : इतिहासकारांच्या हाती नुकतेच असे एक यश लागले आहे, ज्याने संपूर्ण जगाला थक्क केले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसजवळ उत्खननादरम्यान 5,000 वर्षे जुने एक रहस्यमयी थडगे सापडले असून, त्यातून अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
सुरुवातीला ही दगडाची एक साधी वास्तू वाटत होती. मात्र, जेव्हा येथे सापडलेल्या 132 लोकांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात आली, तेव्हा समोर आलेले सत्य एखाद्या हॉलीवूड चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. पॅरिसमधील ‘बरी’ नावाच्या ठिकाणी संशोधकांना हे विशाल पाषाण थडगे सापडले. संशोधनानुसार, या ठिकाणी एक नव्हे, तर दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील लोकांना दफन करण्यात आले होते.
धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही टोळ्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नव्हता. डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील ‘ग्लोब इन्स्टिट्यूट’चे संशोधक फेडरिक व्ही. सीयर्सहोम यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी 132 लोकांच्या दातांचे डीएनए परीक्षण केले. त्यातून पुढील गोष्टी समोर आल्या : पहिली टोळी : इसवी सन पूर्व 3000 च्या आधी राहणारा हा गट उत्तर फ्रान्स आणि जर्मनीतील शेतकरी समूहांचा होता. दुसरी टोळी : काही काळानंतर ज्या दुसऱ्या गटाने या थडग्याचा वापर केला, त्यांचा संबंध दक्षिण फ्रान्स आणि इबेरिया (आजचा स्पेन आणि पोर्तुगाल) यांच्याशी होता. जेनेटिक बेक : सीयर्सहोम यांच्या मते, दोन्ही टोळ्यांच्या जनुकीय रचनेत स्पष्ट फरक दिसून आला आहे.
याचा अर्थ, पहिली संस्कृती अचानक नष्ट झाली आणि त्यांची जागा दुसऱ्या समूहाने घेतली. पहिली टोळी नेमकी कुठे गेली? हे रहस्य अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही; पण मिळालेले पुरावे एका भीषण आपत्तीकडे इशारा करतात. या संशोधनातून आणखी एक मनोरंजक बाब समोर आली. पहिल्या टोळीतील 72 पैकी 55 लोकांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांशेजारी दफन करण्यात आले होते, जे त्यांचे मजबूत कौटुंबिक बंध दर्शवते. मात्र, दुसऱ्या टोळीत ही संख्या फक्त 21 वर आली आणि तिथे एकाच पुरुष वंशाचे वर्चस्व दिसून आले.