मेक्सिकोच्या गुहेत पाचशे वर्षांपूर्वीच्या धार्मिक स्थळाचा शोध Pudhari File Photo
विश्वसंचार

मेक्सिकोच्या गुहेत पाचशे वर्षांपूर्वीच्या धार्मिक स्थळाचा शोध

पुढारी वृत्तसेवा

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमधील उंच पर्वतरांगेतील एका गुहेत संशोधन करत असताना, एका गुहाप्रवेशकर्त्याला सुरुवातीला एखाद्या आजच्या काळातील व्यक्तीने टाकलेला कचरा सापडल्याचा भास झाला. पण, बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात आलं की, तो ‘कचरा’ नसून पाचशे वर्षांपूर्वीच्या विधींमध्ये वापरलेल्या वस्तूंचा संग्रह होता. आत लिंगसद़ृश रचना आणि त्याभोवती धातूचे कडे आढळून आले.

‘मी आत पाहिलं आणि गुहा अजून पुढे जात असल्याचं दिसलं. थोडं दम धरावं लागलं आणि थोडं बुडावं लागलं,‘असं स्पेलिऑलॉजिस्ट (गुहातज्ज्ञ) काटिया पावलोवा यांनी एका भाषांतरित निवेदनात सांगितलं. ‘तेव्हाच आम्हाला स्टॅलॅग्माइट्सच्या (दगडी स्तंभासारखी दंडगोलाकार उभी रचना) भोवती दोन धातूची वळे सापडली. ‘या गुहेचे नाव लायोकोक असे आहे. मेक्सिकोच्या गुएरेरो राज्यात समुद्रसपाटीपासून सुमारे 7,800 फूट (2,380 मीटर) उंचीवर ही गुहा आहे. स्थानिक नाहुआतल भाषेत ‘कोल्ह्यांची गुहा‘ असा अर्थ असलेल्या लायोकोक गुहेला पाणी आणि वटवाघळांसाठी ओळखलं जातं.

सप्टेंबर 2023 मध्ये पावलोवा आणि स्थानिक मार्गदर्शक अ‍ॅद्रिआन बेल्त्रान दीमास या दोघांनी या गुहेत प्रवेश केला. कदाचित, गेली पाचशे वर्षं कोणीही तिथं गेला नसेल. सुमारे 500 फूट आत गेल्यावर गुहेचं छत खाली येत गेलं. फक्त 6 इंच (15 सेंटिमीटर) पाण्याचा आणि छताचा फरक असल्याने त्यांनी बुडत जाऊन मार्गक्रमण केलं. ‘अ‍ॅद्रिआन घाबरला होता; पण पाणी खोल होतं, आणि मी आधी गेले आणि दाखवलं की हे शक्य आहे,‘पावलोवा म्हणाल्या. थोडा विराम घेऊन परिसर पाहताना पावलोवा आणि बेल्त्रान यांनी तब्बल 14 पुरातन वस्तू शोधल्या. ‘हे फारच रोमांचक आणि अविश्वसनीय होतं’ पावलोवा म्हणाल्या.

‘आमचं भाग्य चांगलं होतं.’ या वस्तूंमध्ये चार शंखांच्या बांगड्या, एक मोठा सजवलेला शंख (स्टॉम्बस जातीचा), दोन पूर्ण दगडी चकत्या आणि सहा तुटलेल्या चकत्या, आणि जळालेल्या लाकडाचा एक तुकडा यांचा समावेश होता. त्यांनी तत्काळ मेक्सिकोच्या राष्ट्रीय मानववंशास्त्र व इतिहास संस्थेशी (INAH) संपर्क साधला आणि मार्चमध्ये तज्ज्ञ पुरातत्त्व संशोधकांनी त्या वस्तू मिळवल्या. ‘पूर्व-हिस्पॅनिक संस्कृतींमध्ये गुहा या पवित्र मानल्या जात आणि त्यांचा संबंध अधोलोकाशी तसेच पृथ्वीच्या गर्भाशी जोडला जात असे,’ असे INAH चे पुरातत्त्वज्ञ मिगेल पेरेझ नेग्रेते यांनी सांगितलं. तीन कड्यांवर कोरलेली नक्षी आढळली.

त्यामध्ये ‘झोनेकुईली’ नावाचे ‘एस’ आकाराचे चिन्ह आहे, जे शुक्रग्रहाशी आणि कालमापनाशी संबंधित आहे; तसेच एका मानवसदृश आकृतीचं रूप आहे, जे सृष्टीकर्ता देवता केत्झालकोअटल यांचं प्रतीक असू शकतं. पेरेझ यांनी या वस्तूंचं कालमान मेसोअमेरिकन इतिहासातील पोस्ट-क्लासिक कालखंडातील म्हणजेच इ.स. 950 ते 1521 च्या दरम्यानचं ठरवलं आहे. त्यांचा असा अंदाज आहे की, या वस्तू त्या भागात राहणार्‍या तुलनेनं कमी परिचित असलेल्या लाकोतेपेहुआ संस्कृतीने बनवल्या असाव्यात. ‘गुहेतील वातावरण तुलनेनं स्थिर आणि दमट असल्यामुळे या वस्तू इतक्या शतकं टिकून राहिल्या असाव्यात,’ असं पेरेझ यांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT