लंडन : मध्य इंग्लंडमधील एका कोरड्या पडलेल्या तलावात धातू शोधक यंत्राच्या (मेटल डिटेक्टर) साहाय्याने एका मौल्यवान ऐतिहासिक दागिन्याचा शोध लागला आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वीचा हा शुद्ध सोन्याचा हार ‘ट्युडर’ काळातील असून, तो इंग्लंडचा राजा हेनी आठवा आणि त्याची पहिली पत्नी कॅथरिन ऑफ एरागॉन यांच्याशी संबंधित आहे.
‘ट्युडर हार्ट’ म्हणून ओळखला जाणारा हा हार तीन भागांनी बनलेला आहे. साखळी : 24 कॅरेट सोन्याची ही साखळी 17.1 इंच लांब असून, त्यात 75 कड्या आहेत. याचे वजन 267 ग््रॉम आहे. नक्षीदार हुक : ढगातून बाहेर येणाऱ्या हाताच्या आकाराचा एक ‘क्लॅप’ (हुक) या हाराला जोडलेला आहे, ज्याला हृदयाच्या आकाराचे पदक लटकवण्यात आले आहे.
पदक : या 50 ग््रॉम वजनाच्या पदकावर केलेली नक्षी अत्यंत महत्त्वाची आहे. या पदकाच्या पुढच्या बाजूला पांढऱ्या आणि लाल रंगाचे गुलाब आणि डाळिंबाचे झाड एकमेकांत गुंफलेले दाखवले आहे. गुलाब हे ‘ट्युडर’ घराण्याचे प्रतीक आहे, तर डाळिंब हे राणी कॅथरिनच्या स्पॅनिश मातृभूमीचे प्रतिनिधित्व करते. पदकाच्या मागील बाजूस ‘H’ आणि ‘K’ ही आद्याक्षरे एका दोरीने जोडलेली आहेत, जी हेनी आणि कॅथरिन यांच्या नात्याचे प्रतीक मानली जातात. इतिहासकारांच्या मते, हा दागिना अतिशय दुर्मीळ आहे. राजा हेनी आठवा आणि राणी कॅथरिन यांचा 1533 मध्ये झालेला घटस्फोट अत्यंत कटू ठरला होता. त्या काळात या जोडप्याशी संबंधित अनेक गोष्टी नष्ट करण्यात आल्या होत्या. मात्र, हा दागिना 5 शतकांनंतर सुरक्षित अवस्थेत सापडला आहे. कॅथरिनने सुरुवातीला इंग्लंडचा प्रिन्स आर्थर याच्याशी लग्न केले होते; मात्र अवघ्या पाच महिन्यांत ती विधवा झाली. त्यानंतर 1509 मध्ये तिचे लग्न हेनी आठव्याशी झाले. हेनीने 1509 ते 1547 या काळात इंग्लंडवर राज्य केले. हा शोध बिटनच्या राजघराण्याचा इतिहास आणि त्या काळातील कलाकुसरीवर नवा प्रकाश टाकणारा ठरला आहे.
या दागिन्याच्या दोन्ही बाजूंवर "toujours" हा शब्द कोरलेला आहे. याचा अर्थ ‘पूर्णपणे तुझा/तुझी’ असा निघतो. संग््राहालयातील तज्ज्ञांनी या दागिन्यातील सोन्याच्या गुणवत्तेची आणि बनावटीच्या शैलीची तपासणी केली आहे. त्यानुसार हा दागिना 16 व्या शतकाच्या सुरुवातीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ, राजा हेनी आठवा आणि कॅथरिन यांच्या विवाहाच्या काळातच हा दागिना तयार करण्यात आला असावा.