वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात शेकडो मैलांपर्यंत पसरलेले देवमाशांचे (व्हेल) एक विस्तीर्ण ‘स्मशान’ शोधून काढले आहे. या ठिकाणी सापडलेली काही जीवाश्म हाडे तब्बल ५० लाख वर्षांपेक्षाही जुनी असल्याचा अंदाज आहे.
‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात बुधवारी (१० जून) प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी या खोल समुद्रातील ‘मेगासाईट’ला ‘डायमँटिना झोन नेक्रोपोलिस’ असे नाव दिले आहे. देवमाशांचे सांगाडे आणि जीवाश्मांचा इतका मोठा साठा यापूर्वी कधीही एकत्र आढळलेला नाही. वॉशिंग्टन डी.सी. येथील ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्टरी’मधील जीवाश्म सागरी सस्तन प्राण्यांचे क्युरेटर निक पायन्सन (जे या अभ्यासात थेट सामील नव्हते) यांनी सांगितले की, “हे स्मशान तब्बल १,२०० किलोमीटरपेक्षा (७५० मैल) अधिक परिसरात पसरलेले आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. यासाठी ‘मेगासाईट’ हा शब्द अगदी योग्य आहे.
मला वाटते की त्यांनी काहीतरी अत्यंत दुर्मीळ आणि विशेष शोधून काढले आहे.” ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या इन्स्टिट्यूट ऑफ डीप-सी सायन्स अँड इंजिनिअरिंगचे शास्त्रज्ञ शियाओतोंग पेंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण-पूर्व हिंदी महासागरातील ‘डायमँटिना झोन’ या दऱ्या आणि खडकांच्या भागात समुद्राच्या तळाचे सर्वेक्षण केले. यासाठी त्यांनी ‘फेंडोउझे’ नावाच्या एका विशेष पाणबुडीचा वापर केला. सुरुवातीला एक जीवाश्म दिसल्यानंतर, या पथकाने सुमारे ०.२५ चौरस मैल (०.६४ चौरस किलोमीटर) क्षेत्रात ३२ वेळा समुद्रात डुबकी मारून पाहणी केली. या सर्वेक्षणात त्यांना काय आढळले : एकूण जीवाश्म : ४७६ देवमाशांचे जीवाश्म सापडले.
नुकतेच मृत झालेले देवमासे : ५ मृत देवमाशांचे सांगाडे आढळले. समुद्राची खोली : हा शोध समुद्रात १३,८०० ते २३,००० फूट (४,२०0 ते ७,००० मीटर) इतक्या प्रचंड खोलीवर लागला आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या भागात प्रति चौरस किलोमीटर सरासरी ७ ते ८ मृत देवमाशांचे सांगाडे आणि सुमारे ७५० जीवाश्म असू शकतात. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी सापडलेला सर्वात मोठा सांगाडा १६.४ फूट (५ मीटर) लांबीचा असून, तो ‘अंटार्क्टिक मिंके व्हेल’चा आहे. मात्र, येथील बहुतांश अवशेष हे ‘बीक्ड व्हेल’ प्रजातीचे आहेत. या प्रजातीबद्दल मानवाला अजूनही फार कमी माहिती आहे, कारण हे मासे खुल्या समुद्रात राहतात आणि आपला बहुतेक वेळ समुद्राच्या अत्यंत खोलीवर घालवतात. या शोधामुळे सागरी जीवसृष्टीच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना मोठी मदत होणार आहे.