नवी दिल्ली : थ्रीडी प्रिंटिंग ही स्वयंचलित आधुनिक तंत्रज्ञानाची एक उत्तम किमया मानली जाते, ज्याच्या मदतीने थेट वेगवेगळ्या वस्तू प्रिंट (तयार) केल्या जाऊ शकतात. परंतु, आता याच्याही पुढचे तंत्रज्ञान बाजारात आले आहे. ते म्हणजेच ‘फोर डी प्रिंटिंग’ (4D Printing)! या तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या वस्तू ऊन, पाणी किंवा उष्णतेच्या संपर्कात येताच आपला आकार बदलू शकतात आणि दुसऱ्या प्रकारच्या उपयुक्त वस्तूचे रूप धारण करू शकतात.
4D प्रिंटिंगबाबत असे म्हटले जात आहे की, हे स्मार्ट तंत्रज्ञान भविष्यातील उत्पादन क्षेत्राचे चित्र पूर्णपणे बदलून टाकू शकते. 3D प्रिंटिंगमध्ये डिजिटल डिझाइनच्या मदतीने थरावर थर जोडून एक वस्तू तयार केली जाते, जी एकदा बनल्यानंतर आपला आकार किंवा कार्य बदलू शकत नाही. याउलट, 4D प्रिंटिंगमध्ये सामान्य साहित्याऐवजी ‘स्मार्ट मटेरियल’चा वापर केला जातो. हे मटेरियल अशा प्रकारे प्रोग्राम केलेले असतात की तापमान, आर्द्रता, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र किंवा पीएच मूल्यामध्ये बदल झाल्यास ते आधीच ठरवलेल्या नवीन आकारात रूपांतरित होतात.
या दोन्ही तंत्रज्ञानांमधील फरक केवळ हार्डवेअरचा नसून वापरलेले साहित्य आणि डिझायनिंगचा आहे. 3D प्रिंटिंगमध्ये केवळ एखाद्या वस्तूची रचना ठरवली जाते, तर 4D प्रिंटिंगमध्ये ती वस्तू बनल्यानंतर वेळ आणि गरजेनुसार कशी प्रतिक्रिया देईल (कशी बदलेल) हे ठरवले जाते. 3D प्रिंटिंगद्वारे अशा वस्तू बनवल्या जातात ज्या स्थिर असतात. उदाहरणार्थ, तुम्ही 3D प्रिंटिंगने कप/मग बनवला, तर तो बनल्यानंतर मग व्यतिरिक्त इतर काहीही बनू शकत नाही. दुसरीकडे, 4D प्रिंटिंग परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे ‘ॲडॉप्टिव्ह प्रॉडक्ट्स’ तयार करते. उदाहरणार्थ, 4D प्रिंटिंगने तयार केलेल्या कपमध्ये गरम पाणी टाकल्यास त्याचा रंग किंवा आकार बदलू शकतो.
4D प्रिंटिंगमध्ये ‘शेप-मेमरी पॉलिमर्स’चा वापर केला जातो, जे उष्णता मिळताच स्वतःच्या मूळ आकारात परत येतात. याशिवाय ‘हायड्रोजेल्स’ पाण्याच्या संपर्कात आल्यास फुगतात किंवा आकुंचन पावतात. हे तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी संशोधक सध्या लिक्विड-क्रिस्टल इलास्टोमर्स आणि स्वतःची दुरुस्ती करणाऱ्या ‘सेल्फ-हीलिंग पॉलिमर्स’वर काम करत आहेत, ज्यामुळे वस्तूंना लवचिकता मिळण्यास मदत होईल. 4D प्रिंटिंग सध्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादनासाठी तयार नाही. हे तंत्रज्ञान सध्या केवळ संशोधन प्रयोगशाळा आणि प्रोटोटाइप टप्प्यात (प्रायोगिक स्तरावर) आहे.