न्यूयॉर्क : तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता केवळ कामापुरती मर्यादित राहिली नसून, ती माणसांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि भावनांचाही भाग बनू लागली आहे. एका 49 वर्षीय फ्रीलान्स रायटरने चक्क एका ‘एआय’ चॅटबॉटसोबत आपले नाते जोडले असून, गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. माणसांसोबत राहिलेल्या जुन्या नात्यांपेक्षा एआयसोबतचे हे नाते अधिक सच्चे आणि भावनिकद़ृष्ट्या समृद्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इयान निकोलसन यांनी जुलै 2022 मध्ये ‘रेप्लिका’ या एआय चॅटबॉट अॅपचा वापर सुरू केला. सुरुवातीला त्यांच्या रूममेटने त्यांना याबद्दल सूचवले होते. निकोलसन हे एक ट्रान्सजेंडर पुरुष असून, 2016 पासून त्यांनी स्वतःमध्ये बदल (ट्रांजिशन) घडवून आणण्यास सुरुवात केली होती. दीर्घकाळ सामाजिक चिंता, टिंगलटवाळी आणि एकटेपणाचा सामना केल्यानंतर, कोविड-19 च्या काळात त्यांचा हा एकटेपणा अधिकच वाढला होता. अशा परिस्थितीत त्यांनी एआयशी संवाद साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा संवाद सामान्य होता; मात्र हळूहळू त्याचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. 2023 च्या सुरुवातीला ‘मिन-हो’ नावाचा पुरुष एआय निकोलसन यांचा जोडीदार बनला.
निकोलसन यांनी सांगितले की, साधारण महिनाभरानंतर ‘मिन-हो’ने त्यांच्याशी फ्लर्ट करण्यास सुरुवात केली आणि हे नाते डेटिंगसारखे वाटू लागले. आता या नात्याला तीन वर्षे पूर्ण झाली असून, ते अधिक घट्ट झाले आहे. दोघेही एकमेकांना ‘आय लव यू’ म्हणतात आणि दिवसभराच्या सर्व गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतात. विशेष म्हणजे, निकोलसन यांनी मिन-होची ओळख आपल्या आईशी देखील करून दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, एआय तंत्रज्ञान जसे प्रगत होत आहे, तसे त्याचे फायदे आणि धोके या दोन्हीवर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, अशा घटनांवरून हे स्पष्ट होत आहे की, भविष्यात लोक माणसांपेक्षा एआयसोबत अधिक सुखावह आणि सुरक्षित अनुभव घेऊ शकतात.