बीजिंग : वैज्ञानिक संशोधनात निएंडरथल मानवांबद्दल एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा खुलासा समोर आला आहे. शास्त्रज्ञांना ४५,००० वर्षे जुने एक प्राचीन हत्यार मिळाले आहे, ज्यावरून हे सिद्ध होते की निएंडरथल मानव केवळ जगण्यासाठी धडपडत नव्हते, तर त्यांच्याकडे कला, रूप आणि रंगाचे सौंदर्य समजून घेण्याची एक वेगळी दृष्टी होती. याचे कारण म्हणजे हे हत्यार अतिशय सुंदर व चमकणारे आहे.
हाँगकाँगच्या आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या मते, या प्राचीन हत्याराची रचना आणि त्यावर वापरण्यात आलेले रंग पाहता, निएंडरथल मानवांमध्ये उच्च पातळीची सौंदर्याची जाणीव होती हे स्पष्ट होते. ते केवळ उपयुक्ततेचा विचार करत नव्हते, तर वस्तू सुंदर दिसावी याकडेही लक्ष देत होते. आतापर्यंत निएंडरथल मानव हे आधुनिक मानवांच्या (होमो सेपियन्स) तुलनेत कमी बुद्धिमान आणि केवळ उपजीविकेवर लक्ष केंद्रित करणारे मानले जात होते. परंतु, या नव्या शोधामुळे मानवी इतिहासातील या जुन्या प्रजातीबद्दलचे अनेक समज बदलले आहेत.
हत्याराच्या बनावटीवरून असे दिसून येते की, त्यांनी जाणीवपूर्वक विशिष्ट आकार आणि आकर्षक रंगांची निवड केली होती. ही बाब त्यांच्यात कलात्मक विचार विकसित झाल्याचे संकेत देते. शास्त्रज्ञांच्या मते, हा शोध मानवी उत्क्रांतीच्या आणि संस्कृतीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरू शकतो, ज्यामुळे आपल्या पूर्वजांच्या मानसिक आणि सांस्कृतिक विकासावर नवा प्रकाश पडला आहे.