ओटावा छ कॅनडाच्या सिमको सरोवराच्या पूर्वेकडील काठावर संशोधकांना प्रागैतिहासिक काळातील एका अनोख्या प्राण्याचे जीवाश्म सापडले आहे. संशोधकांनी या जीवाला 'टॉमलिन्सनस दिमित्री' असे नाव दिले आहे. हा प्राणी आर्थोपोडस् म्हणजेच संधीपाद प्राण्यांच्या एका लुप्त कुळातील आहे. या कुळाला मार्रेलोमोर्फ असे म्हटले जाते. हे प्राणी 45 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते.
याठिकाणी सापडणार्या अन्य जलचरांचे जीवाश्म सर्वसामान्यपणे खनिजयुक्त शरीराचे असतात. ते अतिशय कठीण असतात. मात्र, ही प्रजाती पूर्णपणे मऊ शरीराची आहे व त्यामुळेच हा शोध अतिशय चकीत करणारा आहे. टोरांटोच्या रॉयल ओंटारियो संग्रहालयाचे संशोधक जोसेफ मोयसियुक यांनी सांगितले की या ठिकाणी नरम शरीराचा एखादा जीव सापडेल याची आम्हाला अपेक्षा नव्हती. अशा जीवांचे जीवाश्म सापडणे हे दुर्लभ आहे. असे जीवाश्म सापडू शकतील अशी अतिशय कमी ठिकाणे जगात आहेत. हे जीवाश्म दोन इंच लांबीचे आहे. तळहातात ते सहज सामावू शकते. त्याच्या डोक्याची रचना अतिशय जटील असून त्यावर शिंगासारखी आकृती आहे. त्याच्या शरीरात पंखांसारखा मणका असून अन्य शरीर किडे व कोळ्यांसारखे आहे. विशेष म्हणजे या प्राण्याला डोळे नाहीत.