रियाध : सौदी अरेबियातील खैबर ओएसिसमध्ये 4,400 वर्षांपूर्वीच्या छोट्या शहराचे अवशेष आढळून आले आहेत. त्यावरून असे दिसून येते की, या परिसरातील कांस्ययुगामधील लोक इजिप्त व मेसोपोटामियामधील समकालीन लोकांच्या तुलनेत मोठी शहरे वसवण्याबाबत अग्रेसर नव्हते.
पश्चिम सौदी अरेबियातील हेजाझ परिसरातील अल-उला शहराजवळ पुरातत्त्व संशोधकांना या प्राचीन शहराचे अवशेष सापडले आहेत. त्याला त्यांनी ‘अल-नताह’ असे नाव दिले आहे. या मानवी वसाहतीने दीड हेक्टरची जागा व्यापलेली आहे. त्यामध्ये मध्यवर्ती वसाहत व त्याभोवतीने वसलेली दुय्यम वसाहत आणि त्याच्याही बाहेर संरक्षणात्मक यंत्रणा अशी रचना आहे. इसवी सनपूर्व 2400 मधील या छोट्याशा शहरात केवळ पाचशे लोक राहत असावेत, असा अंदाज आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘प्लोस वन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने मातीची भांडी व दगडी जाते मिळाले आहे. तसेच मातीच्या किमान 50 घरांचे अवशेष सापडले आहेत. वसाहतीच्या मध्यवर्ती भागात दोन इमारतींचे अवशेष आहेत. कदाचित या इमारतींचा वापर प्रशासकीय कामासाठी केला जात असावा. मध्यवर्ती भागाच्या पश्चिमेस दफनभूमी आढळली. त्या ठिकाणी मोठ्या आकाराची व उंच थडगी दिसून आल्या. या ठिकाणी लेखनकलेचे नमुने आढळले नाहीत, असे फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे पुरातत्त्व संशोधक गिलौम चार्लौक्स यांनी सांगितले.