तब्बल 43 हजार वर्षांपूर्वीचा मानवी बोटाचा आढळला ठसा Pudhari File Photo
विश्वसंचार

तब्बल 43 हजार वर्षांपूर्वीचा मानवी बोटाचा आढळला ठसा

तो युरोपात सापडलेला एक सर्वात जुना प्रतीकात्मक वस्तूंचा नमुनाही असू शकतो

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : स्पेनमधील एका चेहरासद़ृश खडकावर सापडलेला लाल ठिपका अनेक विक्रमांचा मानकरी ठरू शकतो. सुमारे 43,000 वर्षांपूर्वीचा असलेला हा ठिपका जगातील सर्वात जुना मानवी बोटाचा ठसा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. याचबरोबर, तो युरोपात सापडलेला एक सर्वात जुना प्रतीकात्मक वस्तूंचा नमुनाही असू शकतो.

हा लाल ठिपका ओकर या लाल खनिज पदार्थाने बनवलेला असून तो निएंडरथल मानवाने उमटवलेला असल्याचे सांगितले जात आहे. निएंडरथल हे आधुनिक मानवांचे सर्वात जवळचे पण आता नामशेष झालेले पूर्वज आहेत. त्यांचे अस्तित्व सुमारे 40,000 वर्षांपूर्वी समाप्त झाले, पण त्याआधी हजारो वर्षे ते युरोपात वास्तव्य करत होते. नवीन अभ्यास करणार्‍या संशोधकांच्या मते, हा लाल ठिपका त्या खडकावरील चेहरासद़ृश रचनेत ‘नाक’ दाखवतो.

ही शोध निएंडरथल मानव प्रतीकात्मक कला करू शकत नव्हते या जुन्या समजाला आव्हान देते; मात्र काही तज्ज्ञांनी सांगितले की, हा ठिपका प्रतीकात्मक आहे याबाबत अजूनही शंका आहे. ओहायोमधील केन्यन कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्ववेत्ता ब्रूस हार्डी, जे या शोधात सहभागी नव्हते, म्हणाले की, ‘हा लाल ठिपका नक्कीच जाणूनबुजून लावलेला आहे, पण त्यापलीकडे निश्चित काही सांगता येत नाही. मला त्यात चेहरा दिसला नाही, प्रतीकात्मकता ही पाहणार्‍याच्या द़ृष्टीवर अवलंबून असते.’ हा शोध 5 मे 2025 रोजी ‘आर्कियोलॉजिकल अँड अँथ्रोपोलॉजिकल सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.

ही वस्तू 2022 साली सॅन लाझारो या मध्य स्पेनमधील सेगोव्हियाजवळील एका खडकाच्या आसर्‍याखाली सापडली होती. संशोधकांकडे पुरावे आहेत की 44,000 ते 41,000 वर्षांपूर्वी या भागात निएंडरथल मानव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास होते, पण तिथे आधुनिक मानव म्हणजे होमो सेपियन कधी राहिला होता याचा कोणताही पुरावा नाही. हा खडक सुमारे 15 सेंटीमीटर लांब आहे आणि त्याच्या एका टोकाजवळ भुवयासद़ृश खाच आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, ‘भुवया’च्या खाली ‘नाक’ म्हणून लाल ठिपका जाणीवपूर्वक उमटवल्यामुळे, ही वस्तू एखाद्या मूळ स्वरूपातल्या चेहर्‍याचे चित्रण करणारा मानवी प्रयत्न वाटतो.

निएंडरथल माणसाची कल्पनाशक्ती

स्पेनच्या राष्ट्रीय संशोधन परिषदेने (CSIC) एका भाषांतरित निवेदनात म्हटले आहे की, ‘ही वस्तू जगातील सर्वात जुना आणि पूर्णत: ओळखू येण्याजोगा निएंडरथल बोटाचा ठसा दर्शवते, जो प्रतीकात्मक हेतूने जाणीवपूर्वक उमटवण्यात आला आहे.’ अधिक तपासणी आणि प्रकाश परावर्तन विश्लेषणातून असे आढळले की हा ठिपका बोटाच्या ठशाने उमटवलेला आहे. त्यावर वळणाचा विशिष्ट नमुना दिसतो, जो कदाचित प्रौढ पुरुष निएंडरथलचा असावा. हा ग्रॅनाइटचा खडक जवळच्या नदीतून निवडून विशेषतः या आसर्‍याखाली आणलेला असावा, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. “हा खडक केवळ दिसण्यामुळे निवडला गेला आणि त्यावर ओकरने खूण केली गेली, हे दर्शवते की त्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती, प्रतीकांचे भान आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता होती,’ असे त्यांनी आपल्या अभ्यासात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT