Spain history discovery | स्पेनमध्ये 5,000 वर्षांपूर्वीच्या 43 फूट लांब थडग्याचा शोध 
विश्वसंचार

Spain history discovery | स्पेनमध्ये 5,000 वर्षांपूर्वीच्या 43 फूट लांब थडग्याचा शोध

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : स्पेनच्या दक्षिणेकडील भागात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना 5,000 वर्षांपूर्वीचा एक अतिशय जुना ’डॉल्मेन’ (प्रस्तरयुगीन थडगे) सापडले आहे. या शोधामुळे हजारो वर्षांपूर्वीच्या दफनविधीबद्दल नवीन माहती मिळण्याची शक्यता आहे. स्पेनमधील मालागा प्रांताच्या टेबा येथील ’ला लेन्तेजुएला नेक्रोपोलिस’ (स्मशानभूमी) मध्ये सापडलेल्या या थडग्याला ‘डॉल्मेन ख’ असे नाव दिले आहे. हे थडगे सुमारे 43 फूट लांब असून यात अनेक हाडे ठेवण्यासाठी खोल्या आणि मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कादिझच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी हस्तिदंत, अंबर, समुद्रातील शिंपले आणि अतिशय बारीक काम केलेले गोटे, बाणांचे टोक, मोठी पाती आणि एक प्रभावी भाला यांसारख्या वस्तू सापडल्या आहेत.

या वस्तूंच्या आधारावर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की त्या काळात समाजात सामाजिक उतरंड अस्तित्वात होती आणि दूर-दूरपर्यंत व्यापार चालत असे. टेबा म्युझियमचे संचालक आणि या प्रकल्पाचे सह-प्रमुख प्राध्यापक सेराफिन बेसेरा म्हणाले, ‘संपूर्ण अंडालुसिया प्रदेशातील हे सर्वात भव्य आणि परिपूर्ण थडग्यांपैकी एक असू शकते.‘ युनिव्हर्सिटी ऑफ कादिझचे सह-प्रमुख एडुआर्डो विजँडे यांनी या थडग्याच्या उत्कृष्ट स्थितीवर भर दिला. ते म्हणाले, ‘या संरचनेच्या विलक्षण स्थितीमुळे आपल्याला त्या काळातील लोकांचे जीवन आणि त्यांच्या श्रद्धांबद्दल खूप सखोल माहिती मिळेल.

‘ युनिव्हर्सिटी ऑफ कादिझचे प्राध्यापक जुआन जेसुस कँटिलो म्हणाले, ‘समुद्रापासून दूर असलेल्या या भागात समुद्रातील शिंपल्यांचे सापडणे हे समुद्राचे महत्त्व आणि दूरच्या प्रदेशांशी असलेल्या व्यापाराचे महत्त्व दर्शवते.‘ पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या स्मारकाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी पारंपारिक पद्धतींसोबतच सूक्ष्म-हवामान निरीक्षण आणि एक्स-रे फ्लोरोसेन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. भविष्यातील अभ्यासासाठी या स्मारकाची आणि त्यातील वस्तूंची सविस्तर डिजिटल नोंदणी देखील तयार करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT