File Photo
विश्वसंचार

4100 वर्षांपूर्वीच्या राजवैद्याच्या मकबर्‍याचा इजिप्तमध्ये शोध

पुढारी वृत्तसेवा

कैरो : इजिप्तमध्ये तब्बल 4100 वर्षांपूर्वीच्या एका मकबर्‍याचा शोध लावण्यात आला आहे. हा मकबरा तत्कालिन फेरो म्हणजेच इजिप्तच्या राजांवर औषधोपचार करणार्‍या राजवैद्याचा आहे. सक्कारा येथे या राजवैद्याच्या मकबर्‍याचा स्विस-फ्रेंच पुरातत्त्व संशोधकांच्या पथकाने शोध लावला.

या राजवैद्याचे नाव ‘तेतिनेबेफौ’ असे होते. या मकबर्‍यातील कलाकृतींची कालौघात लूट झालेली असल्याचे आढळले. मात्र मकबर्‍याच्या भिंतींवरील सुंदर पेंटिंग आणि कोरीव मजकूर अद्यापही शाबूत आहे. चित्रांमध्ये त्या काळातील सुरईसारखी वेगवेगळी भांडी, ज्यामध्ये औषधे किंवा तत्सम वस्तू साठवून ठेवल्या जात होत्या, त्यांचा समावेश आहे. या मजकुरामध्ये राजवैद्याचे स्थान आणि त्याने औषधोपचारासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची नावे यांचे वर्णन केलेले आहे. त्याला ‘देवी सर्केत किंवा सेल्केटचा जादूगार’ असे बिरुद होते. ही देवी विंचवांशी निगडित होती व ती विंचवांच्या दंशातून वाचवते, असा समज होता. याचा अर्थ हा राजवैद्य विंचवाच्या दंशावर उपचार करण्यासाठी विशेषतः ओळखला जात होता.

स्विस-फ्रेंच संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणारे जीनिव्हा युनिव्हर्सिटीतील फिलीप कोलोम्बर्ट यांनी याबाबतची माहिती दिली. या मजकुरामध्ये असेही म्हटले आहे की हा वैद्य वनौषधींचा तज्ज्ञ होता. तसेच तो राजाचा मुख्य दंतवैद्यही होता. हे बिरुद प्राचीन इजिप्तचा काळ लक्षात घेता दुर्मीळच म्हणावे लागेल. त्याच्या या बिरुदांवरून असे दिसून येते की, हा माणूस त्याच्या व्यवसायातील अग्रेसर व्यक्ती होता. तो निश्चितच शाही दरबारातील मुख्य वैद्य होता. त्यामुळे त्याने स्वतः फेरोवरही औषधोपचार केले असावेत. त्याच्या थडग्यातील भिंती अनेक रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT