Women Ruled | ४००० वर्षांपूर्वी होते महिलांचे राज्य! 
विश्वसंचार

Women Ruled | ४००० वर्षांपूर्वी होते महिलांचे राज्य!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : प्राचीन ब्रिटिश समाजाविषयीचे अनेक दशकांचे समज मोडीत काढणारे एक खळबळजनक संशोधन समोर आले आहे. ज्याला आजवर इतिहासकार एक महान पुरुष धातुकामगार (सोनार किंवा तांबट) समजत होते, ती प्रत्यक्षात एक स्त्री होती, असे नवीन डीएनए चाचणीत सिद्ध झाले आहे. या शोधामुळे प्राचीन काळातील पितृसत्ताक मानसिकतेच्या सिद्धांतांना मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण इंग्लंडमधील 'अप्टन लव्हेल' येथील एका विशेष दफनभूमीत १९ व्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे ४००० वर्षे जुना एक सांगाडा सापडला होता. या थडग्यात सोन्याचा हार, कुऱ्हाडी आणि हाडांची अणकुचीदार साधने यांसारख्या मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. कुऱ्हाडीच्या टोकावर सोन्याचे अंश आढळल्याने, ही व्यक्ती सोने आणि कांस्य धातूची कारागीर असावी, असा अंदाज वर्तवला गेला. उच्च दर्जाच्या वस्तू आणि हाडांच्या आकारावरून पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ती व्यक्ती पुरुष असावी, असा निष्कर्ष काढला होता. तसेच, त्या काळी महिला केवळ पुरुषांच्या पत्नी म्हणून ओळखल्या जात, असाही एक समज होता.

लंडनच्या 'फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट'चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टॉम बूथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका जनुकीय प्रकल्पांतर्गत या सांगाड्याची पुन्हा तपासणी केली. तीन वेगवेगळ्या नमुन्यांच्या डीएनए चाचणीत ती व्यक्ती 'स्त्री' असल्याचे स्पष्ट झाले. शास्त्रज्ञांच्या मते, मृत्यूसमयी तिचे वय ४५च्या आसपास होते. रजोनिवृत्तीनंतर महिलांची हाडे पुरुषांसारखी दिसू लागतात, तसेच तिची उंची सरासरी पुरुषांइतकी म्हणजे ५ फूट ४ इंच असल्याने पूर्वीच्या संशोधकांचा गैरसमज झाला.

त्या काळी धातू वितळवण्याच्या कलेला गूढ किंवा धार्मिक महत्त्व असायचे, त्यामुळे तिला 'अप्टन लव्हेल शमन' असेही म्हटले गेले. या नवीन शोधामुळे हे स्पष्ट होते की, कांस्य युगात स्त्रिया केवळ परावलंबी नव्हत्या, तर त्या स्वतःच्या कर्तृत्वावर अत्यंत शक्तिशाली, प्रतिष्ठित आणि कुशल कारागीर म्हणून समाजात वावरत होत्या. या ऐतिहासिक संशोधनाची माहिती लंडनमध्ये सुरू झालेल्या ‘वी गो वे बॅक’ या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT