मॉस्को ः रशियाच्या सैबेरिया या अतिथंड भागातील एका 4,000 वर्षांपूर्वीच्या थडग्यात सापडलेल्या योद्ध्याचे शस्त्र, ढाल आणि चेहरा यांची कॉम्प्युटरवर नव्याने पुनर्बांधणी करून समोर आणण्यात आले आहे. हा शोध रशियाच्या साखा प्रजासत्ताकातील (याकुतिया) याकुत्स्क शहराच्या पूर्वेला 140 किलोमीटर अंतरावर केरडुगेन भागात 2004 मध्ये झालेल्या पुरातत्त्व सर्वेक्षणात लागला होता.
या थडग्यातील अवशेष जमिनीच्या बर्याच उथळ थरात सापडले. त्याच्या जवळच काही बाणांचे टोकही आढळले, जे त्याच्याकडे धनुष्य असल्याचे सूचित करतात, जरी ते काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. तसेच प्राण्यांच्या हाडांनी बनवलेली मोठ्या ढालीची प्लेटस् सुद्धा सापडली. रेडिओकार्बन डेटिंगने या थडग्याचे वय सुमारे 4,000 वर्षे असल्याचे स्पष्ट केले. या योद्ध्याच्या अवशेषांवरून त्याची उंची सुमारे 5 फूट 5 इंच (165 सेंमी) असल्याचे समोर आले असून, तो मृत्यूच्या वेळी 40 ते 50 वर्षांचा असावा. त्या काळातील सरासरी आयुष्याच्या मानाने हे वय अधिकच मानले जाते. त्याच्या कवटीच्या स्वरूपावरून तो आजच्या आर्क्टिक भागातील सैबेरियन लोकांच्या वंशाचा असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याच्या हाडांवरील भरून निघालेल्या जखमा त्याच्या लढाऊ आणि सक्रिय जीवनशैलीचे पुरावे देतात, त्याने कदाचित एक योद्धा आणि धनुर्धारी म्हणून आयुष्य जगले असावे. त्याच्या चेहर्याची पुनर्बांधणी करण्यासाठी संशोधकांनी फोटोग्रामेट्री नावाचे तंत्रज्ञान वापरले, ज्यामध्ये अनेक डिजिटल प्रतिमांना एकत्र करून एक आभासी 3डी प्रतिमा तयार केली जाते. त्याचबरोबर, प्राचीन काळातील मानवांचे चेहरे त्यांच्या कवटीवरून पुन्हा तयार करण्यासाठी सोव्हिएत मानववंशशास्त्रज्ञ मिखाईल गेरासिमोव्ह यांनी विकसित केलेली तंत्रे वापरण्यात आली. संशोधकांनी त्याची ढालसुद्धा पुन्हा तयार केली. ती प्राणीहाडांच्या प्लेटस्पासून बनवलेली होती. विशेषतः, अल्टाई वॅपिटी या हरणाच्या हाडांपासून आणि त्या कातड्याच्या आधारावर चिकटवण्यात आल्या होत्या. या हाडांमध्ये बाणांचे तुकडे अडकलेलेही सापडले, ज्यावरून असे दिसते की, ही ढाल युद्धामध्ये वापरली गेली होती आणि तिच्या मालकाचे संरक्षण करत होती. सध्या या योद्ध्याची पुनर्बांधित प्रतिमा याकुत्स्क येथील उत्तर-पूर्व फेडरल विद्यापीठाच्या पुरातत्त्व संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.