माद्रिद : स्पेनमधील पायरेनीज पर्वत रांगांच्या उंचावर संशोधकांना एक रहस्यमय हिरवा दगड सापडला आहे. या शोधामुळे असा निष्कर्ष काढला जात आहे की, प्रागैतिहासिक काळातील मानवाने स्पेनमध्ये सुमारे चार हजार वर्षांहून अधिक काळ उंचावरील भागात तांबे उत्खननाचे केंद्र चालवले होते.
स्पेनच्या गिरोना प्रांतात, फ्रान्सच्या सीमेजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे 2,235 मीटर (7,333 फूट) उंचीवर एका गुहेचा शोध लागला आहे. या गुहेत संशोधकांना मानवी अवशेष, प्राण्यांची हाडे, मातीची तुटलेली भांडी आणि प्राचीन शेकोट्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून असे सिद्ध होते की, लोक पिढ्यान्पिढ्या या हंगामी तळावर परतत होते. ‘फ्रंटियर्स इन एन्व्हायर्नमेंटल आर्किओलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, या गुहेत नैसर्गिकरीत्या न आढळणारे ‘मॅलाकाईट’ नावाच्या हिरव्या खनिजाचे सुमारे 200 तुकडे सापडले आहेत. या गुहेत मोठ्या प्रमाणात कोळसा आणि भट्ट्यांचे अवशेष सापडले आहेत.
संशोधकांच्या मते, प्राचीन लोक मुद्दाम हे खनिज आणि इंधन (कोळसा) उंचावरील गुहेत आणत असत, जेणेकरून उष्णतेचा वापर करून त्यातून तांबे वेगळे करता येईल. ‘हा दगड गुहेत नैसर्गिकरीत्या उपलब्ध नाही, याचा अर्थ मानवाने विशेषतः तांबे प्रक्रियेसाठी तो तिथे आणला होता,’ असे संशोधक पथकाने स्पष्ट केले. युरोपमधील तामयुग साधारणपणे इसवी सन पूर्व 5000 ते 2000 या काळात मानले जाते. याच काळात मानवाने साधने, दागिने आणि भांडी बनवण्यासाठी नैसर्गिक तांब्याचा वापर सुरू केला होता. प्रसिद्ध ‘ओत्झी द आईसमॅन’, जो इसवी सन पूर्व 3300 मध्ये मृत झाला, त्याच्याकडेही तांब्याची कुऱ्हाड सापडली होती. तो देखील अशाच प्रकारे तांब्याच्या शोधात आल्प्स पर्वतात गेला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मॅलाकाईटपासून तांबे मिळवणे तुलनेने सोपे होते. या खनिजाला गरम केल्यावर त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि हिरव्या खनिजाचे रूपांतर काळ्या रंगाच्या ‘कॉपर ऑक्साईड’मध्ये होते. त्यानंतर कोळशाच्या साहाय्याने त्यावर प्रक्रिया केली असता तांब्याचा शुद्ध गोळा शिल्लक राहतो.