4000 Year Old Bridge | इराकमध्ये सापडला ४ हजार वर्षांपूर्वीचा पूल 
विश्वसंचार

4000 Year Old Bridge | इराकमध्ये सापडला ४ हजार वर्षांपूर्वीचा पूल

पुढारी वृत्तसेवा

बगदाद : मानवाने जगातील पहिले रस्ते आणि इमारती कधी बांधल्या, याविषयी नेहमीच कुतूहल असते. मात्र, जगातील सर्वात जुना पूल कुठे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? मध्य पूर्व देशांमधील इराकच्या वाळवंटात तब्बल ४,००० हजार वर्षे जुना आणि पक्क्या विटांपासून बनवलेला हा प्राचीन पूल संशोधकांना सापडला आहे.

प्राचीन सुमेरियन शहर ‘गिरसू’मधील अद्‌भुत‌ शोध

आधुनिक इराकच्या बगदाद आणि बसरा शहरांच्या मधोमध ‘गिरसू’ नावाचे एक प्राचीन शहर वसलेले आहे. जवळपास ५,००० वर्षे जुने हे शहर प्राचीन सुमेरियन संस्कृतीची राजधानी मानले जाते. याच पौराणिक शहराच्या पुरातात्त्विक उत्खननात पक्क्या लाल विटांपासून तयार केलेले एक भक्कम वास्तुकलेचे अवशेष सापडले आहेत. इतिहासकारांच्या मते, हा मानवाने बनवलेला जगातील सर्वात जुना पूल आहे, ज्याचा इतिहास तब्बल ४,००० वर्षे जुना आहे. या ऐतिहासिक शहराची पहिली खोदाई १८७७ मध्ये फ्रेंच पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी सुरू केली होती. मात्र, त्या काळातील अपुऱ्या तंत्रज्ञानामुळे आणि योग्य देखरेखीअभावी या प्राचीन स्थळाचे मोठे नुकसान झाले. अनेक दुर्मीळ क्युनिफॉर्म मातीच्या पाट्या आणि अनमोल कलाकृतींची चोरी झाली.

पुलाचा शोध आणि ऐतिहासिक संभ्रम

या ४,००० जुन्या पुलाची पहिली अधिकृत ओळख १९२० च्या दशकात झाली होती. परंतु, त्या काळातील शास्त्रज्ञांना तो नेमका कशासाठी वापरला जात होता, हे समजले नव्हते. सुरुवातीला या संरचनेला एखादे प्राचीन मंदिर, पाण्याचा डॅम किंवा वॉटर रेग्युलेटर समजले गेले. मात्र, अलीकडच्या दीर्घ संशोधनानंतर हा एक प्राचीन नदी किंवा जलमार्गावर बांधलेला पूलच असल्याचे स्पष्ट झाले.१९२० मध्ये शोध लागल्यानंतरही हा ऐतिहासिक पूल जवळपास १०० वर्षे उघड्यावर आणि दुर्लक्षित अवस्थेत पडला होता. आजच्या आधुनिक काळात या प्राचीन ‘गिरसू’ शहराला अरबी भाषेत ‘तिल्लो’ म्हटले जाते. या पुलाचे महत्त्व लक्षात घेता, ब्रिटिश म्युझियम आणि युके सरकारच्या आर्थिक मदतीने आता या प्राचीन वारसा स्थळाचे जतन करण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT