श्रीनगर : काश्मीरमध्ये चिल्लाई कलान म्हणून ओळखल्या जाणार्या 40 दिवसांच्या कडाक्याच्या हिवाळ्याच्या काळाला रविवारी सुरुवात झाली. यावेळी गुलमर्ग आणि सोनमर्ग यांसारख्या पर्यटन स्थळांसह उंचावरील भागात बर्फवृष्टी झाली, तर श्रीनगरसह सखल भागात पावसाने हजेरी लावली. काश्मीरमधील हिवाळ्याचा सर्वात थंड टप्पा असलेला चिल्लाई कलान 21 डिसेंबरला सुरू होतो आणि 31 जानेवारीला संपतो. या 40 दिवसांच्या काळात संपूर्ण खोरे तीव्र थंडीच्या विळख्यात असते. यादरम्यान बर्फवृष्टी आणि पावसाची दाट शक्यता असते, तर रात्रीचे तापमान अनेकदा गोठणबिंदूच्या खाली असते.
चिल्लाई कलानमध्ये रात्रीच्या वेळी नळ आणि पाण्याचे साठे गोठतात, ज्यामुळे लोकांना नळांमधील पाणी वितळवण्यासाठी पाईप्स गरम करावे लागतात. 1985 मध्ये श्रीनगरचे प्रसिद्ध दाल सरोवर पूर्णपणे गोठले होते आणि एका जीपने या गोठलेल्या थरावरून एक टोक ते दुसरे टोक गाठले होते. 1986 मध्येही हे सरोवर पुन्हा गोठले होते, तेव्हा लोकांनी त्यावर आईस हॉकी आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता.
या काळात काश्मिरी लोक न्याहारीसाठी हरिसा नावाच्या गरम मांसयुक्त पदार्थांचा आस्वाद घेतात. चिल्लाई कलाननंतर 20 दिवसांचा चिल्लाई-खुर्द (लहान थंडी) आणि 10 दिवसांचा चिल्लाई-बच्चा (बाळ थंडी) हा काळ येतो. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग, मध्य काश्मीरमधील सोनमर्ग, दूधपथरी आणि इतर उंचावरील भाग जसे की राजदान पास, साधना टॉप आणि पीर की गली येथे बर्फवृष्टी झाली आहे. श्रीनगरसह मैदानी भागात पाऊस पडला. या हिवाळ्यात आतापर्यंत खोर्यात मोठी बर्फवृष्टी झालेली नाही. मात्र, हवामान खात्याने चिल्लाई कलानच्या सुरुवातीलाच पावसाचा अंदाज वर्तवला आहे.