टोकियो ः सध्याचा जमाना थ्री-डी प्रिंटिंगचा आहे. या तंत्राने कमी वेळेतच घरेही बांधली जात आहेत! जपानमध्ये तर अवघ्या सहा तासांमध्येच थ्री-डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन उभे करण्यात आले. हे स्टेशन आहे हत्सुशिमा. हत्सुशिमा स्थानकाने जुन्या लाकडी स्थानकाची जागा घेतली आहे. जुने स्टेशन 1948 मध्ये बांधण्यात आले होते.
2018 पासून हे स्टेशन स्वयंचलित आहे. या स्थानकावर एकच रेल्वे मार्ग असून, दर तासाला एक ते तीन गाड्या धावतात आणि दररोज सुमारे 530 प्रवासी प्रवास करतात. पश्चिम जपान रेल्वे कंपनीने स्टेशनचा काही भाग तयार करण्यासाठी सेरेंडिक्स नावाच्या बांधकाम कंपनीला नियुक्त केले. सेरेंडिक्सच्या मते, हे भाग इतरत्र ‘छापून’ त्यांना काँक्रीटने बळकट करण्यासाठी सात दिवस लागले. क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतातील एका कारखान्यात ही ‘छपाई’ झाली. ट्रकने हे भाग 804 कि.मी. दूर असलेल्या हत्सुशिमा स्थानकात आणण्यात आले. सेरेंडिक्सचे सहसंस्थापक कुनिहिरो हांडा म्हणाले, सामान्यत: बांधकामासाठी अनेक महिने लागतात. रात्री गाड्या थांबल्यानंतर बांधकामाचे काम केले जाते. रेल्वे मार्गांवर बांधकामाचे कडक नियम आहेत, त्यामुळे गाड्यांच्या वेळेवर परिणाम होऊ नये म्हणून हे काम सहसा रात्री केले जाते. सकाळी 5.45 वाजता पहिली गाडी येण्यापूर्वी 1,000 चौरस फुटांचे स्टेशन तयार झाले होते. मात्र, आतील कामे, तिकीट मशिन, कार्ड रीडर अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. जुलैमध्ये हे स्थानक प्रवाशांसाठी खुले होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.