व्हँक्युवर : गेल्या काही दशकांपासून वैज्ञानिकांना भेडसावणार्या प्रागैतिहासिक ‘सागरी दैत्या’च्या ओळखीचे रहस्य अखेर वैज्ञानिकांनी उलगडले आहे. हा ‘सागरी दैत्य’ म्हणजे अतिशय महाकाय असा एक सरीसृप प्राणी होता. या प्रजातीमधील सरीसृप सुमारे 39 फूट (12 मीटर) लांब वाढत असत आणि त्यांचे दात अत्यंत मजबूत होते, जे त्यांना भक्ष्याचे कवच फोडून खाण्यासाठी उपयुक्त ठरत. गेल्या दोन दशकांमध्ये सापडलेल्या अनेक जीवाश्मांच्या आधारे त्याचे अस्तित्व माहीत होते, पण याची नेमकी ओळख निश्चित झाली नव्हती.
या संशोधनात निर्णायक ठरलेले एक जीवाश्म म्हणजे 1988 मध्ये कॅनडाच्या बि—टिश कोलंबियातील व्हँक्युवर बेटावर सापडलेला एका प्रौढ सरीसृपाचा संपूर्ण पण खराब स्थितीत का होईना जतन झालेला सांगाडा. याचा संबंध प्लेसिओसॉर या लांब मान असलेल्या सरीसृपांच्या गटाशी असावा, असा अंदाज होता. मात्र, ही आधीच माहीत असलेली प्रजाती आहे की नवी, हे निश्चित करता येत नव्हते. ‘या जीवाश्मांचे खरेखुरे प्राणी कोणते हे ठरवणे एक कोडे होते,’ असे मार्शल विद्यापीठातील (वेस्ट व्हर्जिनिया) शरीररचना तज्ज्ञ प्रा. एफ. रॉबिन ओ’कीफे यांनी म्हटले. ‘आमच्या नव्या संशोधनाने हे रहस्य आता स्पष्ट केले आहे.’
22 मे रोजी ‘जर्नल ऑफ सिस्टीमेटिक पॅलिओंटोलॉजी’ मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात, ओ’कीफे आणि त्यांच्या सहकार्यांनी या सर्व जीवाश्मांचे वर्गीकरण ‘ट्रास्कासौर सँड्री’ ( Traskasaura sandrae) किंवा ‘टी. सँड्री’ या नावाने केले आहे. ही प्रजाती इतकी वेगळी आहे की संशोधकांनी तिला ‘ट्रास्कासौर’ नावाचा पूर्णतः नवा वंश (genus) दिला, जो प्लेसिओसॉरच्या ‘एलॅस्मोसॉर’ उपगटामध्ये मोडतो. ‘टी. सँड्री’चे पहिले जीवाश्म 1988 मध्ये व्हँकुव्हर बेटावरील ‘हॅसलम फॉर्मेशन’मध्ये सापडले होते, आणि 2002 मध्ये यांचे शास्त्रीय वर्णन प्रथम करण्यात आले. हे जीवाश्म 86 ते 83 दशलक्ष वर्षांपूर्वीचे असल्याचे ठरवले गेले आहे. त्या भागात सापडलेले इतर जीवाश्मांमध्ये एक उजव्या बाजूचा ह्युमरस (वरचा हाताचा हाड) आणि एक अत्यंत चांगल्या स्थितीत जतन झालेला सांगाडा यांचा समावेश आहे.
एखाद्या सागरी दैत्यासारखे असणारे एलॅस्मोसॉर, इतर प्लेसिओसॉरप्रमाणे, क्रेटेशस युगात (145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी) पृथ्वीवर अस्तित्वात होते. यामध्येच ‘टी. सँड्री’चा समावेश होतो. हे सरीसृप डायनोसोरच्या युगात समुद्रात इचथिओसॉर आणि मोसासॉर यांसारख्या इतर समुद्री प्राण्यांसोबत राहत. त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये लांब मान, लहान डोके, रुंद शरीर आणि चार मोठे पॅडलसद़ृश पाय हे होते. स्कॉटलंडमधील लोच नेस तळ्यात एक भला मोठा प्राणी दिसला असे दावे आजपर्यंत अनेकांनी केले आहेत. त्याला ‘लोच नेस मॉन्स्टर’ (Loch Ness Monster) म्हटले जाते. त्या कल्पित प्राण्याशीही यांचं साधर्म्य आहे. हे प्राणी हवेत श्वास घेत असावेत आणि आधुनिक समुद्री सस्तन प्राण्यांप्रमाणे त्यांना श्वास घेण्यासाठी नियमितपणे पृष्ठभागावर यावे लागत असावे, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.