वॉशिंग्टन : पृथ्वीवरील महासागर हे अनेक अनोख्या जीवांचे निवासस्थान आहेत. त्यामध्येच जायंट फँटम जेली या जलचराचा समावेश होतो. या जेलीला ‘स्टिगियोमेड्युसा गिगँटिया’ असे वैज्ञानिक नाव आहे. आर्क्टिक महासागर वगळता अन्य सर्व महासागरांमध्ये ही महाकाय जेली आढळते. खोल पाण्यात राहणारी ही जेली माणसाच्या नजरेत क्वचितच येत असते. या जेलीला 3.3 फूट किंवा 1 मीटर रुंदीचे ‘डोके’ असते व त्याखाली रिबनसारख्या चार भुजा असतात. या भुजा तब्बल 33 फूट म्हणजेच 10 मीटर लांबीपर्यंत वाढू शकतात. ही जेली महासागरातील सर्वात मोठ्या अपृष्ठवंशीय शिकारी जीवांपैकी एक आहे.
सन 1899 मध्ये जायंट फँटम जेलीचे पहिले नमुने गोळा करण्यात आले होते. त्याचे विश्लेषण सन 1910 मध्ये झाले. आतापर्यंत ही जेली केवळ 120 वेळा दिसून आली आहे. याचे कारण ही जेली सहसा पाण्याच्या पृष्ठभागापासून 22 हजार फूट खोलीवर असते. इतक्या खोलीवर पाण्याचा अतिशय दाब असतो, पण या जेलीचे लवचिक शरीर ते सहन करण्यास सक्षम असते. 2022 मध्ये अंटार्क्टिकामधील सबमर्सिबल मोहिमांदरम्यान, तीन वेगवेगळ्या वेळी अशी जायंट फँटम जेली आढळून आली होती. त्यावेळी त्यांची जी छायाचित्रे किंवा व्हिडीओ कॅमेर्यात कैद करण्यात आले, तेव्हा ती तुलनेने उथळ पाण्यात म्हणजे 260 ते 920 फूट खोलीवर होती. अन्य जेलीफिशप्रमाणे जायंट फँटम जेलीकडे भक्ष्य पकडण्यासाठी स्टिंगिंग टेंटॅकल्स नसतात. त्याऐवजी ही जेली आपल्या भक्ष्याला लांबलचक भुजांचा विळखा घालून पकडतात. त्यांच्या भक्ष्यामध्ये प्लँक्टन किंवा छोट्या माशांचा समावेश असतो. ही जेली पिल्लांना थेट जन्म देते. विशेष म्हणजे ही पिल्ली आईच्या मुखातून बाहेर पडतात. या जेली मंद प्रकाशही उत्सर्जित करू शकतात.