ब्रनो : झेक प्रजासत्ताकच्या ब्रनो शहराजवळ सापडलेल्या कांस्य धातूच्या तुकड्यांचे विश्लेषण करताना पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एक आश्चर्यकारक शोध लागला आहे. त्यांना तब्बल 3,200 वर्षे जुन्या योद्ध्याच्या छातीवरील चिलखताचे अवशेष सापडले आहेत. देशात अशा प्रकारचे प्राचीन कांस्य चिलखत सापडण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे, ज्यामुळे या शोधाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
2023 मध्ये, काही मेटल डिटेक्टर वापरणार्या हौशी संशोधकांनी या ठिकाणी भाला, विळा, सुई आणि तांब्याचे अनेक तुकडे सापडल्याची माहिती दिली होती. ब्रनो शहर संग्रहालयाच्या माहितीनुसार, या सर्व वस्तू हेतूपुरस्सर खराब करून एकत्र पुरण्यात आल्या होत्या. हा एखाद्या धार्मिक विधीचा भाग असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या वस्तूंसोबत सापडलेल्या एका विचित्र दुमडलेल्या धातूच्या तुकड्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांना दोन वर्षे लागली.
‘थ्रीडी स्कॅनिंगच्या मदतीने आम्ही या दुमडलेल्या पत्र्याला डिजिटल पद्धतीने उलगडण्यात यशस्वी झालो आणि त्याचा आकार व त्यावरील नक्षीकाम ओळखले,’ असे ब्रनो शहर संग्रहालयाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ आलेश नवरातील यांनी सांगितले. ‘सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यावर त्यावरील नक्षीकामानेच हे स्पष्ट केले की, हा शरीराचे संरक्षण करणार्या चिलखताचाच एक भाग आहे.’ हे चिलखत उत्तर कांस्य युगातील (इ.स.पू. 1600 ते 1200) असल्याचे निश्चित झाले आहे. हा तोच काळ आहे, जो ट्रोजन युद्धासाठी आणि भूमध्यसागरीय प्रदेशातील सामाजिक उलथापालथीसाठी ओळखला जातो.