विश्वसंचार

31 हजार वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करून काढला होता पाय!

Arun Patil

जकार्ता : 'शल्यचिकित्सा' किंवा 'शस्त्रक्रिया' (सर्जरी) ही काही आधुनिक युगाचीच देणगी आहे असे नाही. प्राचीन काळातील लोकही शस्त्रक्रिया करीत होते याचे पुरावे देश-विदेशात सापडलेले आहेत. आपल्याकडे तर 'सश्रृत संहिता'मध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असणार्‍या अवजारांची माहिती पाहायला मिळते. आता इंडोनेशियाच्या पुरातत्त्व संशोधकांनी एक असा मानवी सांगाडा शोधून काढला आहे ज्यामधून प्राचीन काळातील शस्त्रक्रियेचा नमुना पाहायला मिळतो. तब्बल 31 हजार वर्षांपूर्वीच्या या मुलाचा पाय शस्त्रक्रिया करून काढण्यात आला होता!

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'नेचर' या नियतकालिकात देण्यात आली आहे. हा सांगाडा एका प्रौढ शिकारी मुलाचा तो सध्याच्या बोर्नियो बेटावर राहत होता. तेथील 'लियांग तेबो' नावाच्या गुहेत हा सांगाडा आढळला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी युनिव्हर्सिटीमधील मेलांद्री वोक यांनी सांगितले की या मुलाचा पाय लहानपणीच कापला होता असे आढळले आहे. हा सांगाडा सुस्थितीत असून केवळ हा कापलेला पाय त्यामध्ये नाही.

संशोधकांनी या सांगाड्याचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की या मुलाचा एक पाय हा काळाच्या ओघात गायब झालेला नाही की तो अपघाताने गेलेला नाही. तो नीट शस्त्रक्रिया करूनच कापलेला होता. पाय काढल्यानंतर हा मुलगा 6 ते 9 वर्षे जगला होता. या डोंगराळ भागात तो नंतर अनेक वर्षे काठीच्या सहाय्याने चालत होता. या मुलाने इतक्या लहान वयात ही धोकादायक शस्त्रक्रिया सहन केली हे मोठेच नवल आहे. काळाच्या ओघात त्याचे घाव भरले होते व त्वचा सुकली होती.

कदाचित त्याचा पाय लहानपणी एखाद्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेला असावा व त्यामुळे तो काढावा लागला असावा, असे संशोधकांना वाटते. यापूर्वीची अशा प्रकारची नोंद ही फ्रान्समधील आहे. फ्रान्समध्ये शस्त्रक्रिया करून हात काढलेला एक सांगाडा आढळून आला होता. हा सांगाडा 7 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT