लिमा : पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी पेरूच्या वायव्य किनारपट्टीवर एका भव्य त्रिमितीय भित्तिचित्राचा शोध लावला आहे. तब्बल 3,000 वर्षे जुने असूनही या चित्रावरील निळा, पिवळा, लाल आणि काळा रंग आजही स्पष्ट दिसतो. या भित्तिचित्रावर मासे, तारे आणि अनेक पौराणिक प्राण्यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत, ज्यामुळे प्राचीन संस्कृतीच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली आहे.
पॉन्टिफिकल कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ पेरूच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ सेसिलिया मॉरिसिओ यांनी सांगितले की, ‘यावरील चित्रकला, सजावटीचे अनोखे तंत्र आणि उत्कृष्ट जतनस्थिती, यामुळे हा या प्रदेशातील एक खरोखरच अभूतपूर्व शोध आहे.’ मॉरिसिओ आणि त्यांच्या टीमने जुलै महिन्याच्या सुरुवातीला हुआका योलांडा या पुरातत्त्वस्थळावर उत्खनन सुरू केले. उत्खननाच्या पहिल्याच आठवड्यात त्यांना हे भित्तिचित्र सापडले. हे चित्र रचनात्मक कालखंडातील (Formative Period - इ.स.पू. 2000 ते 1000) असल्याचे मानले जाते.
पेरूमध्ये याच काळात पहिल्यांदा गुंतागुंतीच्या सामाजिक रचना उदयास आल्या होत्या. हे भव्य भित्तिचित्र सुमारे 20 फूट (6 मीटर) लांब आणि 9.5 फूट (2.9 मीटर) उंच आहे. या चित्राचे दोन भाग असून, त्यावर वेगवेगळ्या आकृत्या कोरलेल्या आहेत. दक्षिण बाजू : या बाजूला पंख पसरलेल्या एका मोठ्या पक्ष्याची आकृती आहे, ज्याच्या डोक्यावर हिर्याच्या आकाराचे चिन्ह आहे. मॉरिसिओ यांच्या मते, हा पक्षी गरुड किंवा ससाणा असू शकतो. उत्तर बाजू : या बाजूला वनस्पती, तारे आणि मानवासारख्या आकृत्या आहेत.
मॉरिसिओ यांच्या मते, ‘या आकृत्या ‘शमन’ किंवा तत्कालीन समाजातील शक्तिशाली व्यक्तींचे प्रतिनिधित्व करत असाव्यात.’ सध्याच्या पुराव्यांनुसार, ‘हे भित्तिचित्र रचनात्मक कालखंडातील एका मंदिराच्या मुख्य प्रांगणातील अंतर्गत सजावटीचा भाग असावे,’ असे मॉरिसिओ यांनी सांगितले. हुआका योलांडा हे स्थळ इंका साम्राज्याच्या जन्मापूर्वी अँडीजमधील एक प्रमुख धार्मिकस्थळ असलेल्या ‘चाविन दे हुआंतार’च्या काळातच वापरात असावे, असा अंदाज आहे.