कैरो : जॉर्डनमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एक कोरीव शिलालेख दस्तावेजीकृत केला आहे, ज्यावर प्राचीन इजिप्शियन फेरो म्हणजेच राजा असलेल्या रामेसेस तिसर्याचे नाव कोरलेले आहे. रामेसेस तिसरा सुमारे 3,200 वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.पू. 1184 ते 1153 दरम्यान सत्तेवर होता, अशी माहिती जॉर्डनच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने एका अनुवादित निवेदनात दिली.
रामेसेस तिसर्याच्या काळात संपूर्ण प्रदेशात मोठ्या उलथापालथी घडल्या. मायसीनियन (ग्रीस आणि एजियन बेटांमध्ये वसलेले) आणि हित्तीटस् (आधुनिक तुर्कीत वसलेले) यांसारख्या अनेक सामर्थ्यशाली संस्कृतींचा अस्त झाला आणि ‘सी पीपल’ (समुद्रजन) नावाचा गट मध्यपूर्वेसह इजिप्तवरही आक्रमण करत होता. ऐतिहासिक नोंदींनुसार रामेसेस तिसर्याने ‘सी पीपल’चा पराभव केला आणि भूमध्य सागराच्या पूर्वेकडील भागात मोहिमा राबवून इजिप्तचे साम—ाज्य टिकवून ठेवले. ही शिला दक्षिण जॉर्डनमधील वादी रम या संरक्षित वाळवंटी क्षेत्रात आढळली, जिथे अनेक पुरातत्त्वीय अवशेष आहेत.
जरी काही लोकांना या शिलालेखाच्या अस्तित्वाची माहिती होती, तरी गेल्या वर्षभरातच त्याचे शास्त्रीय पद्धतीने दस्तावेजीकरण करण्यात आले. ‘हा शिलालेख एका नैसर्गिक जलस्रोताजवळ आहे, आणि ते ठिकाण अत्यंत कठीण आहे,’ असे हाशेमाईट विद्यापीठातील सांस्कृतिक साधन व्यवस्थापन आणि संग्रहालयशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अली Ab-मानासेर यांनी सांगितले. ‘हा शोध विशेष महत्त्वाचा आहे. कारण, हा जॉर्डनमध्ये सापडलेला पहिलाच असा शिलालेख आहे, जो एका स्थिर, मोठ्या खडकावर कोरलेला आहे आणि जो पर्वतरचनेचा भाग आहे,’ असे मानासेर म्हणाले.
याआधी जॉर्डनच्या उत्तरेकडील भागात इजिप्तीयन शिलालेख सापडला होता; पण तो एका हालवता येणार्या दगडावर कोरलेला होता. या नव्या शिलालेखाचे वैशिष्ट्य म्हणजे तो एका स्थिर आणि उठावदार खडकावर आहे. इजिप्तचे माजी पुरातत्त्व मंत्री झही हवास, जे सध्या जॉर्डनमधील संशोधकांसोबत काम करत आहेत, यांनी सांगितले की, या शिलालेखात रामेसेस तिसर्याचे नाव दिले असून, त्याला ‘सा-रे’ (अथवा रा पुत्र) असे संबोधले आहे. ‘रा’ हा प्राचीन इजिप्तमध्ये सूर्यदेवता मानला जात असे. हवास यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा रामेसेस तिसर्याचे सैन्य त्या भागातून गेले तेव्हा हा शिलालेख कोरला गेला. हवास यांनी पुढे नमूद केले की, रामेसेस तिसर्याच्या सैन्याने आजच्या वायव्य सौदी अरेबियातील तायमा या ठिकाणीही असाच एक शिलालेख कोरला होता.