वॉशिंग्टन : एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने आजच्या इक्वेडोरमध्ये ३,००० वर्षांहून अधिक काळापूर्वी राहणाऱ्या एका मानवाचा चेहरा यशस्वीरीत्या पुनर्रचित (Reconstruct) केला आहे. या मानवी कवटीचा इतिहास मानववंशशास्त्रातील एका मोठ्या ऐतिहासिक वादाशी जोडलेला होता.
हा चेहरा ‘पुनिन-२’ नावाच्या कवटीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. १९७० च्या दशकात इक्वेडोरच्या मध्य अँडीज पर्वतरांगेतील ‘पुनिन’ शहराजवळ एका दरीत एका शेतकऱ्याला ही कवटी सापडली होती. याआधी १९२३ मध्ये ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या एका मोहिमेदरम्यान याच दरीत ‘पुनिन-१’ नावाची अशीच एक कवटी सापडली होती. त्या काळातील काही वैज्ञानिकांनी असा दावा केला होता की, या कवटीची शारीरिक वैशिष्ट्ये विशेषतः तिचा फुगीर कपाळाचा भाग अतिशय प्राचीन स्वरूपाचा होता. त्यामुळे १९२५ मध्ये वैज्ञानिकांनी असा सिद्धांत मांडला की, ही पहिली पुनिन कवटी ऑस्ट्रेलिया किंवा पॅसिफिक बेटांवरील लोकांशी असलेल्या प्राचीन संपर्कातून आलेली असावी आणि ती ‘ओशनिक’ वंशाचा पुरावा आहे.
ही कवटी ज्या प्राचीन गाळाच्या थरांमध्ये आढळली होती जिथे ५० वर्षांनंतर पुनिन-२ कवटीही सापडली, तो थर आधुनिक मानवाच्या (होमो सॅपियन्स) अस्तित्वापूर्वीचा मानला जात होता. त्यामुळे हे अवशेष ‘होमो इरेक्टस’ किंवा ‘निएंडरथल’ सारख्या मानवाच्या लुप्त झालेल्या प्रजातींचे असावेत का, असा प्रश्न वैज्ञानिकांना पडला होता; मात्र नंतरच्या अभ्यासांनी या जुन्या सिद्धांतांना आव्हान दिले. आता नव्याने करण्यात आलेल्या चेहऱ्याच्या पुनर्रचनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, ‘पुनिन-२’ ही कवटी एका आधुनिक मानवाचीच होती आणि त्याचे पूर्वज पूर्णपणे ‘नेटीव्ह अमेरिकन’ होते.
ब्रिटनमधील स्वतंत्र न्यायवैद्यक कपाल-चेहरा मानवशास्त्रज्ञ (Forensic Craniofacial Anthropologist) क्रिस्टोफर रिन यांनी सांगितले की, “पुनिन-२ कवटी ही मूळची एका अमेरिकन पुरुषाचीच होती, ज्यांचे पूर्वज शेवटच्या हिमयुगात उत्तर सैबेरिया आणि पूर्व आशियाई भागांतून तेथे आले होते, यात आता शंका उरलेली नाही.” रिन यांनी पुढे सांगितले, “पुनिन-२ ची कवटी समोरून पाहिली असता पूर्व आशियाई कवटीसारखी दिसते; परंतु बाजूने ती अजिबात तशी दिसत नाही.” इक्वेडोरमधील रिन यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना या कवटीचा अभ्यास करण्याची परवानगी दिली होती, ज्यावर त्यांनी गेल्या वर्षी काम सुरू केले. दरम्यान, ‘पुनिन-१’ ही पहिली ऐतिहासिक कवटी सध्या न्यूयॉर्क शहरातील ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’मध्ये ठेवण्यात आलेली आहे.