गांधीनगर : डॉक्टर बनणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते; पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या अडचणींवर मात करणे सोपे नसते. गुजरातच्या भावनगर येथील गणेश बरैया यांनी जो संघर्ष केला, तो खर्या अर्थाने प्रेरणा देणारा आहे. गणेश बरैया यांची उंची केवळ 3 फूट आणि वजन फक्त 20 किलो आहे; पण त्यांच्या स्वप्नांची उंची इतकी मोठी होती की, कोणताही अडथळा त्यांना रोखू शकला नाही.
गणेश बरैया एका सामान्य कुटुंबातून येतात आणि आठ भावंडांपैकी एक आहेत. लहानपणापासूनच त्यांना बुटकेपणाची समस्या होती. मात्र, त्यांचे डॉक्टर बनण्याचे आणि लोकांची सेवा करण्याचे स्वप्न होते. 2018 मध्ये जेव्हा त्यांनी एमबीबीएसमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला, तेव्हा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला; कारण त्यांची उंची डॉक्टर बनण्यासाठी योग्य नाही, असे सांगण्यात आले. हा नकार ऐकून कोणीही हार मानली असती; पण गणेश यांनी हिंमत सोडली नाही. गणेश बरैया यांनी आपल्या शाळेचे प्राचार्य डॉ. दलपतभाई कटारिया यांच्या मदतीने कायदेशीर लढाई सुरू केली. त्यांनी आधी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली; पण तिथेही निराशा मिळाली. तरीही त्यांनी धीर सोडला नाही आणि सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. चार महिन्यांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, उंची कोणाच्याही स्वप्नांना अडवू शकत नाही आणि गणेश यांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाल्यावरही गणेश यांचा संघर्ष थांबला नाही. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणे सोपे नव्हते. लॅबमध्ये पोहोचणे, क्लासरूममध्ये बसणे, इंटर्नशिप करणे... या प्रत्येक कामात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला; पण त्यांनी आपल्या हिंमत, मेहनत आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने प्रत्येक आव्हान पार केले. आज इतक्या अडचणींनंतर, गणेश बरैया गुजरात सरकारमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. ते लोकांवर उपचार करतात, त्यांचे प्राण वाचवतात आणि त्यांच्या यशाने सर्वांना प्रेरणा देत आहेत. त्यांची इच्छा आहे की, ते त्यांच्या आईसाठी पक्के घर बनवतील; कारण आजही त्यांचे कुटुंब कच्च्या घरात राहते. ते आपल्या कुटुंबाला चांगले आयुष्य देऊ इच्छितात आणि ज्या मुलांची स्वप्ने आर्थिक किंवा शारीरिक अडचणींमध्ये अडकतात, त्यांना मदत करू इच्छितात.