Iraq Ancient Tombs: इराकमध्ये सापडली तब्बल 2,300 वर्षांपूर्वीची 40 थडगी  Pudhari Photo
विश्वसंचार

Iraq Ancient Tombs: इराकमध्ये सापडली तब्बल 2,300 वर्षांपूर्वीची 40 थडगी

इराकमध्ये भीषण दुष्काळामुळे मोसुल धरणातील पाणी कमी झाल्याने तब्बल 2,300 वर्षांपूर्वीची प्राचीन थडगी बाहेर आली

पुढारी वृत्तसेवा

दोहोक (इराक) : इराकमध्ये भीषण दुष्काळामुळे मोसुल धरणातील पाणी कमी झाल्याने तब्बल 2,300 वर्षांपूर्वीची प्राचीन थडगी बाहेर आली आहेत. उत्तर इराकमधील दोहोक प्रांतात ही 40 थडगी आढळली असून ती हेल्लेनिस्टिक काळातील असल्याचे मानले जात आहे.

या काळात इराक सेल्युसिड साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. हे साम्राज्य एकेकाळी आजच्या तुर्कस्तानपासून भारताच्या सीमेपर्यंत पसरलेले होते. 2022 मध्ये याच मोसुल धरणाजवळ 3,400 वर्षांपूर्वीच्या प्राचीन शहराचे अवशेष पाण्याखालील भागातून सापडले होते. मोसुल धरणाचे पाणी सर्वात नीचांकी पातळीवर गेल्यानंतर पुरातत्त्वतज्ज्ञांना या थडग्यांपर्यंत पोहोचता आले, असे उत्खनन मोहिमेचे प्रमुख बेकास ब्रेफकनी यांनी सांगितले.

ते म्हणाले, पाणी कमी झाल्याने जरी स्थानिकांना मोठे नुकसान झाले असले, तरी आमच्यासारख्या पुरातत्त्वज्ञांना हे भाग पुन्हा पाहण्याची दुर्मीळ संधी मिळाली आहे. आता या थडग्यांचे तातडीने उत्खनन करून सापडलेली साधने व वस्तू दोहोक संग्रहालयात संशोधन व जतनासाठी हलवली जातील. संशोधकांना या दफनभूमीतील व्यक्तींचे मृत्यूचे कारण, कौटुंबिक नाती आणि त्या काळातील सामाजिक संदर्भ समजून घेता येतील, अशी आशा आहे.

इराकमध्ये गेल्या काही वर्षांतले सलग दुष्काळ देशाला मानवी संकटाच्या उंबरठ्यावर घेऊन गेले आहेत. पाणीटंचाई, वाळूची वादळे व तापमानवाढ यामुळे इराक हवामान बदलामुळे सर्वाधिक धोक्यात असलेल्या देशांपैकी एक ठरला असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. याच दुष्काळांमुळे मागील काही वर्षांत इराकभर प्राचीन वस्तू व अवशेष सापडले आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला मोसुलमध्ये अस्सिरियन साम्राज्याची राजधानी निनवे येथील अवशेषांतून राजा अशुर्बनिपाल आणि देवतांचे चित्र असलेला दुर्मीळ शिलालेखही आढळला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT