वॉशिंग्टन : उत्तर अमेरिकेतील व्योमिंग येथे नुकतेच 23 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे जीवाश्म आढळले आहे. ते आता उत्तर अमेरिकेतील सर्वात जुने डायनासोर जीवाश्म ठरले आहे. हे जीवाश्म कोंबडीच्या आकाराच्या होते. या संशोधनामुळे जेभर डायनासोर कसे फैलावले हे जाणून घेण्यासाठी मदत मिळेल. या प्रकारच्या डायनासोरचे जीवाश्म यापूर्वी आढळले नव्हते. हे डायनासोर अगदी सुरुवातीच्या काळातील होते.
महाकाय डायनासोरचे हे छोट्याशा, कोंबडीइतक्या आकाराचे डायनासोर दूरचे पूर्वज म्हणता येतील असे होते. त्यांच्या जीवाश्माने आता पॅलिओंटोलॉजिस्टना थक्क केले आहे. 25 कोटी वर्षांपूर्वीच्या काळात उत्तर अमेरिका खंडात डायनासोर नव्हते अशी त्यांची आजपर्यंतची धारणा होती. ती आता या जीवाश्माच्या शोधाने चुकीची ठरली आहे. या प्रजातीला ‘अहवायतुम बहंडुविचे’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीच्या काही डायनासोरचे अवशेष 2012 पासून मिळण्यास सुरुवात झाली होती. व्योमिंगच्या पोपो एजी फॉर्मेशनमध्ये हे आंशिक अवशेष मिळू लागल्यानंतर त्याबाबतचे कुतुहल वाढले होते. या जीवाश्मांमध्ये पायाच्या हाडांचा समावेश आहे, जे 23 कोटी वर्षांपूर्वीच्या ट्रायसिक काळातील आहेत.
या प्रजातीचे नाव ‘अतिशय जुन्या काळातील डायनासोर’ असे सुचवणारे आहे. ते पूर्व शोशोन आदिवासी जमातीच्या भाषेतील आहे. ज्या ठिकाणी हे जीवाश्म सापडले ती भूमी त्यांच्या पूर्वजांची आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘झुलॉजिकल जर्नल ऑफ द लिनियन सोसायटी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हे डायनासोर एक फूट उंचीचे आणि डोक्यापासून शेपटीपर्यंत तीन फूट लांबीचे होते. ज्या डायनासोरचे जीवाश्म सापडले आहेत ते पूर्ण वाढ झालेले प्रौढ होते असे मानले जाते. अतिशय अवाढव्य आकाराच्या व लांब मानेच्या सॉरोपॉडस्चे हे दूरस्थ पूर्वज होते, असे त्यांच्या पायाच्या हाडांच्या आकारावरून दिसून येते.