विश्वसंचार

2028 पर्यंत बनणार दक्षिण कोरियाचे तरंगते शहर

Arun Patil

सेऊल : 'पाण्यावर तरंगणारे शहर' ही एक रंजक कल्पना आहे. अर्थात जगात अनेक ठिकाणी तरंगणारी छोटी गावं पाहायला मिळतात, जी नैसर्गिकरीत्या बनलेली आहेत. मात्र आता दक्षिण कोरियात पाण्यावर तरंगणारे एक शहर बनवले जात आहे. तेथील बुसानमध्ये 'ओसियानिक्स' नावाचे हे शहर बनत आहे, जे जगातील पहिले तरंगणारे शहर ठरेल. यावर्षीच्या अखेरपर्यंत त्याचे काम सुरू होईल आणि सर्व काही सुरळीत झाले तर ते 2028 पर्यंत तयार होईल.

हे ओसियानिक्स शहर बनवण्यासाठी ग्रीन काँक्रिटच्या बॉक्सवर बनवल्या जात असलेल्या प्लॅटफॉर्मला समुद्रात आणून जोडले जाईल. सुमारे 6.3 हेक्टर जागेत ही मरिन स्मार्ट सिटी बनवली जाईल जिथे बारा हजार लोक राहू शकतील. अर्थात या शहराला नंतर एक लाख लोकांच्या निवासासाठी वाढवले जाईल. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार ओसियानिक्स शहरात राहण्यासाठी, खेळण्यासाठी, मनोरंजन आणि शॉपिंगसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील. या शहरातील बहुतांश इमारतींवर सौरऊर्जेचे पॅनेल बसवले जातील. त्यांच्या सहाय्याने ऊर्जानिर्मिती केली जाईल.

इमारतींना अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की, त्या ताशी 250 किलोमीटरच्या वादळाचाही सामना करतील. या इमारती सात मजल्यांपेक्षा कमी उंचीच्या असतील. या शहरासाठीचे प्लॅटफॉर्म्स हेक्सागन म्हणजेच षटकोनी असतील. पर्यावरणाला अनुकूल अशा काँक्रिटमुळे हे प्लॅटफॉर्म्स मजबूतही असतील. त्यामुळे समुद्राच्या वेगवान व मोठ्या लाटांचा तडाखाही ते सहन करतील. ग्रीन काँक्रिट हे जैवकचर्‍यापासून बनवले जाते व ते सामान्य काँक्रिटपेक्षा अधिक टिकाऊ असते. शहरासाठी बनवलेल्या अशा प्लॅटफॉर्म्सखाली जाळ्या लावल्या जातील, ज्या सीफूड म्हणजे मासे, कोळंबी, झिंगे अशा स्वरूपाच्या आहारासाठी उपयुक्त ठरतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT