वॉशिंग्टन : जग लवकरच एका मोठ्या आणि दुर्मीळ खग्रास सूर्यग्रहणाचा साक्षीदार होणार आहे. हे ग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी लागणार असून, याला ‘शतकातील सर्वात मोठे ग्रहण’ म्हटले जात आहे. युरोप, उत्तर आफ्रिका आणि अरब देशांच्या काही भागांतून हे दुर्मीळ खग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आहे. या ग्रहणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा कालावधी. तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद चालणारे हे ग्रहण गेल्या 100 वर्षांतील सर्वात जास्त काळ चालणारे सूर्यग्रहण ठरणार आहे.
खगोलप्रेमींसाठी 2 ऑगस्ट 2027 हा दिवस अत्यंत खास असणार आहे. या दिवशी जगाच्या मोठ्या भागातून सूर्य पूर्णपणे दिसेनासा होईल आणि सुमारे साडेसहा मिनिटांसाठी जग अंधारात बुडून जाईल. गेल्या अनेक शतकांच्या इतिहासातील हे सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल. यापूर्वी इसवी सन पूर्व 743 मध्ये इतिहासातील सर्वात मोठे सूर्यग्रहण लागले होते, जे 7 मिनिटे 28 सेकंद चालले होते. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार्या सूर्यग्रहणाचा पूर्ण मार्ग 275 किलोमीटर रुंद असेल, ज्यामुळे तो अनेक खंडांमधून जाईल. आफ्रिकेतील बहुतांश देशांमधून ते पाहता येणार आहे. या सूर्यग्रहणाचा प्रवास अटलांटिक महासागरातून सुरू होऊन जिब्राल्टरची सामुद्रधुनी, दक्षिण स्पेन, उत्तर आफ्रिकेतून अरबी द्वीपकल्पापर्यंत जाईल; मात्र हिंद महासागरावर ते अंधुक दिसेल.
हे खग्रास सूर्यग्रहण सर्वप्रथम दक्षिण स्पेन, जिब्राल्टर आणि मोरोक्कोमध्ये दिसेल. त्यानंतर अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया आणि इजिप्तमध्ये सूर्य आकाशात सर्वोच्च स्थानी असताना हे ग्रहण दिसेल. इजिप्तनंतर सूर्यग्रहण लाल समुद्र ओलांडून सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालियामध्ये अंधार करेल. स्पेनमधील काडिझ आणि मलागा या शहरांमध्ये चार मिनिटांपेक्षा जास्त काळ पूर्ण अंधार राहील.