बँकॉक : थायलंडमधील पुरातत्त्व शास्त्रज्ञांना ‘पेतचाबुरी’ प्रांतातील एका पुरातत्त्व स्थळावर उत्खननादरम्यान दोन अत्यंत जुन्या भारतीय सोन्याच्या अंगठ्या सापडल्या आहेत. या अंगठ्या सुमारे १,९०० ते २,१०० वर्षे जुन्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही महत्त्वपूर्ण शोधमोहीम 'बान लाट' जिल्ह्यातील 'डॉन याई थॉन्ग' या पुरातत्त्व स्थळावर पार पडली. या ठिकाणी संशोधक सध्या प्राचीन थडग्यांचे अवशेष आणि इतर ऐतिहासिक वस्तूंचे उत्खनन करत आहेत.
थायलंडच्या ‘फाइन आर्टस् डिपार्टमेंट’चे डायरेक्टर-जनरल फानोमबुत चंतराचोती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या अंगठ्यांपैकी एका अंगठीवर काहीतरी कोरलेले आहे, जे प्राचीन 'ब्राह्मी लिपी'मध्ये असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते ही अंगठी बहुधा एखाद्या भारतीय व्यापारी समुदायातील व्यापाऱ्याची असावी. हा शोध भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियाच्या मुख्य भूमीमधील सुरुवातीच्या प्राचीन व्यापारी संबंधांकडे स्पष्ट संकेत करतो.
उत्खननात सापडलेल्या या दोन्ही मौल्यवान अंगठ्या 'राचाबुरी' प्रांतातील 'फ्रा नाखोन खिरी म्युझियम'मध्ये (संग्रहालय) पाठवण्यात आल्या आहेत. तिथे त्या सुरक्षित ठेवल्या जातील आणि त्यांच्यावर पुढील सखोल संशोधन केले जाईल. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक स्थळावरील उत्खननाचा वेग वाढवला आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि मोसमी पावसामुळे उत्खननात सापडलेल्या कांस्य (ब्रॉन्झ) वस्तू व मानवी अवशेषांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वस्तू लवकरात लवकर बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.