रिओ डी जनैरो : ब्राझीलच्या पुरातत्त्व संशोधकांनी दोन हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्पे शोधून काढली आहेत. त्यामध्ये मानवी पाऊलखुणा, दैवी जगतातील लोकांच्या आकृत्या; तसेच हरणे, डुक्कर यांसारख्या प्राण्यांच्या आकृत्यांचा समावेश आहे. 2022 ते 2023 या काळात टोकँटिन्स राज्यातील जलापाओ स्टेट पार्कमध्ये करण्यात आलेल्या तीन मोहिमांमधून हे संशोधन करण्यात आले.
ब्राझीलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिक अँड आर्टिस्टिक हेरिटेजच्या संशोधकांनी अशी 16 प्राचीन ठिकाणे शोधून काढली आहेत. ही सर्व कातळशिल्पे उंच कड्यांवर एकमेकांपासून जवळच्या अंतरावरच आहेत. रोमुलो मॅसेडो या संशोधकाने सांगितले की, या परिसरात त्यावेळी राहणार्या स्थानिक लोकांची संस्कृती, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी ही शिल्पे सहायक आहेत.
यापैकी काही ठिकाणी लाल रंगामध्ये केलेली काही भित्तिचित्रेही आढळली आहेत. ती कोरीव कामापेक्षा अधिक जुनी असून, अन्य एखाद्या सांस्कृतिक समूहाने बनवलेली असावीत. येथील कातळशिल्पे ही अतिशय दुर्मीळ आणि महत्त्वाची आहेत, असेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी प्राचीन काळातील काही दगडी अवजारेही सापडली आहेत.