विश्वसंचार

Spain bronze vessel discovery | स्पेनमध्ये सापडले 1900 वर्षे जुने ‘कांस्य पात्र’

पुढारी वृत्तसेवा

माद्रिद : स्पेनमध्ये एका तुटलेल्या कांस्य पात्राचा अपघाती शोध लागला असून, त्यावर इंग्लंडमधील जगप्रसिद्ध ‌’हॅड्रियन वॉल‌’ आणि रोमन किल्ल्यांची १९०० वर्षे जुनी चित्रे कोरलेली असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. रोमन साम्राज्याच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या एखाद्या सैनिकाने आपल्या आठवणीची खूण म्हणून हे रंगीत पात्र बनवून घेतले असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.

हे पात्र मध्य स्पेनमधील ‌’बर्लांगा डी ड्युअरो‌’ या भागात सापडले आहे. विशेष म्हणजे, हे ठिकाण इंग्लंडमधील त्या ऐतिहासिक रोमन भिंतीपासून तब्बल २,००० किलोमीटर लांब आहे. ‌’बर्लांगा कप‌’ म्हणून ओळखले जाणारे हे पात्र सुमारे ४.५ इंच रुंद आणि ३.२ इंच उंच आहे. यावर रंगीत एनामेल डिझाईन आणि लॅटिन भाषेत चार किल्ल्यांच्या नावांचा उल्लेख असलेला मजकूर कोरलेला आहे. या पात्रावर किलर्नम, ओन्नो, विन्डोबाला आणि कोंडरकॉम या चार किल्ल्यांची नावे आहेत. हे किल्ले हॅड्रियन वॉलच्या पूर्व बाजूला होते.

प्रत्येक किल्ला चार चौकोन आणि दोन अर्धचंद्राकृती आकारांनी दर्शविला आहे, जे किल्ल्याचे बुरुज किंवा प्रवेशद्वार दर्शवतात. यामध्ये लाल, हिरवा, आकाशी आणि गडद निळ्या रंगाच्या एनामेलचा वापर करण्यात आला आहे. मेरीडा येथील पुरातत्त्व संस्थेचे संशोधक जेसस गार्शिया सांचेझ यांच्या मते, हे केवळ धातूचे पात्र नसून मौल्यवान रंगांनी सजवलेली एक खास वस्तू आहे. हे औद्योगिक उत्पादन नसून वैयक्तिकरीत्या बनवून घेतलेली कलाकृती आहे. या पात्राच्या विश्लेषणानुसार, ते तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणातून बनवलेले आहे. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात शिशाचा वापर करण्यात आला असून, हे शिसे उत्तर इंग्लंडमधील खाणींमधून आले असावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

‌’बिटानिया‌’ या नियतकालिकात २३ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, हे पात्र इ.स. १२४ ते १९९ च्या दरम्यान हॅड्रियन वॉलच्या जवळील एखाद्या स्थानिक कारागिराने बनवले असावे. मात्र, इंग्लंडमध्ये तयार झालेले हे पात्र इतक्या दूर स्पेनमध्ये कसे पोहोचले, हे अद्याप एक गूढच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT