फ्रँकफर्ट : जर्मनीतील ‘टौनस’ पर्वताच्या झाडीने वेढलेल्या पायथ्याशी रोमन युद्धाचा देव ‘मार्स’ (मंगळ) याला समर्पित १,८०० वर्षांपूर्वीचे एक प्राचीन मंदिर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. जर्मेनिक जमातींच्या आक्रमणांपासून रोमन साम्राज्याच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी तिसऱ्या शतकात उभारण्यात आलेल्या लष्करी वस्तीचा हे मंदिर एक भाग होते.
आपल्या साम्राज्य विस्तारादरम्यान रोमन सैन्याने युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये हजारो किल्ले बांधले होते. यापैकी बहुतांश तटबंदीच्या लगत ‘व्हिकस’ नावाची नागरी वस्ती वसलेली असे. या वस्तीमध्ये प्रामुख्याने व्यापारी, सैनिकांचे कुटुंबीय आणि इतर नागरिक राहत असत. हेसे राज्य स्मारक संरक्षण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रँकफर्टच्या उत्तरेस सुमारे २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या हेसे प्रदेशातील ‘कापर्सबर्ग’ रोमन किल्ला आणि लगतच्या वस्तीच्या ठिकाणी २०२४ पासून उत्खनन सुरू आहे. या उत्खननादरम्यान एका अप्रत्याशित रोमन मंदिराचा शोध लागला असल्याचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ काई मुकेनबर्गर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मंदिराच्या आत आम्हाला समर्पणाची अक्षरे कोरलेल्या शिलालेखाचे अनेक तुकडे सापडले आहेत.’’ या शिलालेखातील काही भागाचे तज्ज्ञांनी वाचन केले असून, हे मंदिर रोमन युद्धाचा देव ‘मार्स’ याला समर्पित असल्याचे त्यात नमूद आहे. मुकेनबर्गर यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, मंदिरामध्ये मार्स देवाच्या पुतळ्याचे अवशेष सापडले आहेत. याशिवाय हातात खजुराची फांदी आणि लॉरेलचे वर्तुळाकार पान-मुकुट घेतलेली एक पंख असलेली मूर्तीही आढळली आहे. ही मूर्ती प्राचीन रोमन युद्धातील विजयाची देवता मानल्या जाणाऱ्या ‘व्हिक्टोरिया’ देवीची असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.