Ancient Roman House | रोममधील हायस्कूलच्या जिमखाली सापडले १८०० वर्षांपूवीचे घर 
विश्वसंचार

Ancient Roman House | रोममधील हायस्कूलच्या जिमखाली सापडले १८०० वर्षांपूवीचे घर

पुढारी वृत्तसेवा

रोम : इटलीची राजधानी रोममधील एका हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एका मोठ्या रहस्याचा उलगडा केला आहे. 'लिसेओ सायंटिफिक कॅव्हूर' या प्रसिद्ध कोलसियम जवळ असलेल्या हायस्कूलच्या जिमच्या मजल्याखाली विद्यार्थ्यांना १८०० वर्षांपूर्वीचे एक भव्य आणि आलिशान रोमन घर सापडले आहे. अनेक वर्षांपासून शाळेच्या जिमखाली गुप्त खोल्या असल्याच्या अफवा विद्यार्थी सांगत होते, त्‍या आ‍‍ता खऱ्या ठरल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी गुप्तपणे जमिनीखालील भुयारांचा शोध घेत असताना त्यांना ही प्राचीन वास्तू दिसली. त्यांनी तातडीने ही माहिती त्यांच्या शिक्षिका क्लॉडिया मारिनो यांना दिली. शिक्षिकेने पुरातत्त्व विभागाला माहिती दिल्‍यानंतर जानेवारी २०२६ मध्ये येथे अधिकृत उत्खनन सुरू करण्यात आले. २८ मे रोजी पुरातत्त्वशास्त्रज्ञ फिलिपो कोआरेली आणि शिक्षिका मारिनो यांनी हा शोध जाहीर केला.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, हे भुयारी आणि अंधारे कक्ष दुसऱ्या शतकातील एका श्रीमंत रोमन कुटुंबाचे आलिशान 'व्हिला' होते. १९ व्या शतकातील एका जुन्या शिलालेखाच्या आधारे, हे घर 'उम्ब्रियस' कुटुंबाच्या मालकीचे असावे, असा अंदाज आहे. हे कुटुंब मूळचे दक्षिण-मध्य इटलीतील 'सॅमनिअम' प्रदेशातील असावे, जो इ.स. ७९ मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या पाँपेई शहराच्या जवळ आहे. सध्या या वास्तूला 'डोमस लिसेओ कॅव्हूर' असे नाव देण्यात आले आहे. उत्खननादरम्यान या घराच्या भिंतींवर आकर्षक नक्षीकाम, रंगीबेरंगी चित्रे आणि छतावर उत्कृष्ट कलाकुसर आढळून आली आहे.

एका खोलीत त्या काळातील श्रीमंतांच्या पसंतीची वैशिष्ट्यपूर्ण मोझॅक टाईल्सची रचनाही सापडली आहे. यासोबतच २० व्या शतकातील काही पर्यटकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या भिंतींवरील खुणाही येथे दिसल्या आहेत. या ऐतिहासिक घराचा केवळ काही भागच अद्याप समोर आला असून, उर्वरित भाग शाळेच्या इमारतीखाली विस्तारलेला आहे. भविष्यात हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्याचा विचार असून, या हायस्कूलचे विद्यार्थीच येथे मार्गदर्शक (गाईड) म्हणून काम करतील, अशी योजना आखली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT