कीव : रोमन साम्राज्याच्या सीमेवर, युक्रेनमधील पुरातत्त्व संशोधकांना १,८०० वर्षे जुने एक रंगीबेरंगी पट्टा बकल सापडले असून, ते प्राचीन काळातील एका भटक्या अश्वारोही (घोडदळ) योद्ध्याचे असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
युक्रेनच्या आग्नेय भागातील ‘त्सेत्सेन जंगलात’ (Tsetsyn Forest) स्थानिक रहिवाशांना हे बकल सापडले. त्यानंतर त्यांनी ते बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अँटोनियो मोइसेई यांच्याकडे सुपूर्द केले. एका अनुवादित निवेदनानुसार, साधारणपणे चौरस आकाराच्या या धातूच्या बकलची प्रत्येक बाजू सुमारे ०.८ इंच (२.१ सेमी) असून, त्यावर निळसर आणि पिवळ्या रंगाच्या मिनाराचे नक्षीकाम केलेले आहे. प्राध्यापक मोइसेई यांच्या मते, या नक्षीची शैली आणि धातूच्या बांधणीवरून हे बकल इसवी सनाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातील असावे. ज्या काळात युक्रेनचा हा भाग ‘रोमन डाकिया’ या प्राचीन प्रांताचा हिस्सा होता.
सम्राट ट्रोजनच्या काळात, रोमने डाकिया साम्राज्याचे लोक आणि त्यांचे नेते ‘डिसिबॅलस’ यांच्याविरुद्ध डाशियन युद्धादरम्यान (इ.स. १०१-१०२ आणि १०५-१०६) लढा दिला होता. रोमन लष्कराने डाकियाचा पराभव करून आपल्या साम्राज्यात विलीन केले होते. ट्रोजनने या विजयाचा रोममध्ये जोरदार उत्सव साजरा केला होता, ज्याची महती सांगणारा एक प्रसिद्ध स्तंभ डाशियन युद्धांच्या तपशीलांची साक्ष देतो. या बकलव्यतिरिक्त, मोइसेई यांनी एक सजावटीचे बेल्ट फिटिंग आणि तीन लहान गोल धातूच्या वस्तू गोळा केल्या, ज्या कदाचित याच पट्ट्याचा भाग असाव्यात. जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी जंगलात हरवण्यापूर्वी हा पट्टा कसा दिसत असेल, याची एक पुनर्रचना मोइसेई यांनी तयार केली आहे.
मात्र, हा पट्टा नेमका कोणाचा होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोइसेई यांच्या मते, हा पट्टा मूळचा काळ्या समुद्राच्या परिसरातील ‘सार्माशियन’ जातीच्या घोडेस्वार योद्ध्याचा असावा. सार्माशियन हे असे जनजाती गट होते जे रोमन साम्राज्याच्या सीमेबाहेर, आजच्या मध्य युक्रेन, दक्षिण रशिया आणि बाल्कन प्रदेशात राहत होते. काही सार्माशियन योद्ध्यांनी रोमन साम्राज्याच्या आक्रमणाविरुद्ध लढा दिला, तर काहींनी भाडोत्री सैनिक म्हणून रोमच्या बाजूने युद्ध केले. निवेदनानुसार, धातूचे हे पट्ट्याचे तुकडे रोमन प्रांतीय हस्तकला संस्कृतीचा एक भाग आहेत, जे कदाचित व्यापारातून किंवा युद्धातील लुटालुटीचे बक्षीस म्हणून मिळाले असावेत. हा पट्टा खरोखरच सार्माशियन योद्ध्याचा होता की नाही, हे सिद्ध करण्यासाठी मोइसेई अद्याप या पुराव्यांचा अभ्यास करत आहेत. कारण, काहीही असो, हे लष्करी बकल रोमन साम्राज्याच्या सीमेवरील लष्करी संपर्काचा नवा पुरावा देतो, ज्यावरून युद्धाच्या काळात रोमनांचे स्थानिक डाशियन लोकांशी कसे संबंध होते, हे समजण्यास तज्ज्ञांना मदत होईल.