Early Human Fire | १८ लाख वर्षांपूर्वीच मानवाने केला होता अग्नीचा वापर 
विश्वसंचार

Early Human Fire | १८ लाख वर्षांपूर्वीच मानवाने केला होता अग्नीचा वापर

द. आफ्रिकेत सापडले पुरावे; मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाला कलाटणी देणारा शोध

पुढारी वृत्तसेवा

जेरुसलेम : मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक महत्त्वपूर्ण शोध दक्षिण आफ्रिकेत लागला आहे. आफ्रिकेतील ‘वंडरवर्क गुहेत’ शास्त्रज्ञांना १८ लाख वर्षांपूर्वीचे जळालेले हाडांचे अवशेष सापडले आहेत. या शोधामुळे मानवाने अग्नीचा (आगीचा) वापर सुरू केल्याचा काळ आता थेट दुप्पट मागे गेला आहे. यापूर्वी मानवाद्वारे अग्नीच्या वापराचे सर्वात जुने पुरावे सुमारे १० लाख वर्षांपूर्वीचे मानले जात होते.

‘होमो इरेक्टस्‌’ आणि अग्नीचे नाते

‘प्लॉस वन’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, हा पराक्रम आधुनिक मानवाचे (होमो सेपियन्‍स) पूर्वज असलेल्या ‘होमो इरेक्टस्‌’ या प्रजातीने केला होता. शास्त्रज्ञांच्या मते, या आदिमानवांना स्वतःहून आग निर्माण करण्याची कला (उदा. दगड घासून आग लावणे) अवगत नसावी. मात्र, जंगलातील नैसर्गिक वणव्यांपासून लागलेली आग त्यांनी गुहेत आणली असावी आणि ती सातत्याने पेटती ठेवली असावी.

शोध लागला कसा?

जेरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका लिओरा हॉर्विट्झ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी एका नव्या आणि स्वस्त ‘ल्युमिनेसेन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून हे संशोधन केले. या पद्धतीत हाडांच्या तुकड्यांवर विशिष्ट रंगाचा निळा प्रकाश टाकला जातो.

जळालेली हाडे या प्रकाशात चमकतात, तर न जळालेली हाडे अंधारात राहतात. गुहेत आढळलेले हे अवशेष घुबडांनी शिकार केलेल्या उंदरांचे आहेत. विशेष म्हणजे, हे जळालेले अवशेष गुहेच्या प्रवेशद्वारापासून तब्बल १०० फूट आत सापडले आहेत. एवढ्या खोलवर जंगलातील वणव्याची आग पोहोचणे अशक्य असल्याने, आदिमानवानेच ती जाणीवपूर्वक आत आणली असल्याच्या निष्कर्षाला बळकटी मिळते. पॅलिओअँथ्रोपोलॉजिस्ट मायकेल चाझान यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला अग्नीच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे मिळत आहेत. आता प्रश्न असा आहे की ते या आगीचा वापर कशासाठी करत होते?’’

काही शास्त्रज्ञांच्या मते, आदिमानव गुहेतील सुकलेले पालापाचोळा किंवा प्राण्यांची विष्ठा ही आग पेटती ठेवण्यासाठी इंधन म्हणून वापरत असावेत. काही तज्ज्ञांनी यावर शंका उपस्थित केली असली, तरी हा शोध मानवी संस्कृतीच्या पायावर नवीन प्रकाश टाकणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT