Ancient Tombs | इजिप्तमध्ये सापडल्या सोन्याच्या ‘जिभा’ असलेल्या अठरा प्राचीन कबरी 
विश्वसंचार

Ancient Tombs | इजिप्तमध्ये सापडल्या सोन्याच्या ‘जिभा’ असलेल्या अठरा प्राचीन कबरी

पुढारी वृत्तसेवा

कैरो : इजिप्तच्या भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील ‘मरीना एल-अलामीन’ या प्राचीन शहरात पुरातत्त्व शास्त्रज्ञांना १८ प्राचीन कबरी शोधण्यात यश आले आहे. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या कबर टॉलेमिक (ख्रिस्तपूर्व ३२२ ते ३०) किंवा रोमन (ख्रिस्तपूर्व ३० ते इसवी सन ३९५) कालखंडातील असाव्यात. या कबर आणि ढिगाऱ्यांमध्ये अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत, त्‍यात सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे 'सोन्याच्या २४ जिभा' आहेत, त्‍या मृतांच्या (ममी) तोंडात ठेवल्या गेल्या होत्या.

प्राचीन इजिप्तमधील समजुतीनुसार, सोने हे देवाचे मांस मानले जाई. मृत व्यक्तीला परलोकात देवाशी संवाद साधता यावा, विशेषतः ओसिरिस देवाच्या समोर न्यायनिवाड्याच्या वेळी स्वतःची बाजू मांडता यावी, म्हणून या सोन्याच्या जिभा त्यांच्या तोंडात ठेवल्या जात असत. सापडलेल्या जिभांपैकी एक जीभ ‘आय ऑफ होरस’ (होरसचा डोळा) या आकाराची आहे, जी वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी वापरली जाई.

या उत्खननात ११ कबर जमिनीच्या आत खोलवर खोदलेल्या, तर ७ कबर जमिनीच्या पृष्ठभागाजवळ आढळल्या आहेत. एका कबरीत अडीच मीटर लांब ग्रॅनाइटची शवपेटी सापडली असून, त्यात मानवी सांगाडे आहेत. याशिवाय, इथे एक बळी देण्याचे ठिकाण आढळले आहे, त्‍याची रचना एका 'काल्पनिक दरवाजासारखी' आहे. पारंपरिक इजिप्शियन संस्कृतीत हा काल्पनिक दरवाजा जिवंत आणि मृत जगाला जोडणारा मार्ग मानला जाई. तसेच, तिथे ग्रीक संस्कृतीचा प्रभाव दर्शवणारी ‘अफ्रॉडिटी' या सौंदर्य आणि प्रेमाच्या देवतेची एक अपूर्ण मूर्तीही सापडली आहे. ही मूर्ती त्या काळात इजिप्शियन आणि ग्रीक-रोमन संस्कृती एकत्र नांदत असल्याचे सिद्ध करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT