historical calculator | सतराव्या शतकातील अनोखा ‘कॅल्क्युलेटर’! 
विश्वसंचार

historical calculator | सतराव्या शतकातील अनोखा ‘कॅल्क्युलेटर’!

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस ः जगातील पहिल्या कॅल्क्युलेटिंग मशिनपैकी एक असलेली ‘ला पास्कालाईन’ या ऐतिहासिक वस्तूचा नियोजित लिलाव फ्रान्समध्ये होणार नाही. पॅरिसमधील न्यायालयाने या ऐतिहासिक वस्तूला देशाबाहेर निर्यात करण्यावर तात्पुरती बंदी घातल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लिलाव गृह ‘ख्रिस्तीज’ने या बातमीला दुजोरा दिला आहे की, फे्रंच गणितज्ञ ब्लेझ पास्कल यांनी 1642 मध्ये विकसित केलेल्या ‘ला पास्कालाईन’ मशिनची बोली प्रक्रिया आता पुढे केली जाणार नाही. या मशिनचे मूल्यमापन भारतीय चलनानुसार सुमारे 18 ते 27 कोटी रुपये इतके केले गेले होते. ‘ख्रिस्तीज’ ने या मशिनला ‘आतापर्यंत लिलावात देऊ केलेली सर्वात महत्त्वाची वैज्ञानिक वस्तू’ असे म्हटले होते. संशोधकांनी या ऐतिहासिक उपकरणाला वारसा संरक्षण मिळावे, यासाठी कायदेशीर अपील केले होते.

त्यांचे म्हणणे होते की, या मशिनला ‘राष्ट्रीय खजिना’ म्हणून वर्गीकृत केले पाहिजे. ‘ख्रिस्तीज’नुसार, पास्कल यांनी कॅल्क्युलेटरची सुरुवातीची आवृत्ती विकसित केली तेव्हा त्यांचे वय अवघे 19 वर्षे होते. या मशिनच्या केवळ नऊ प्रती आजही अस्तित्वात आहेत. ‘मानवी बुद्धिमत्तेची जागा मशिनने घेण्याचा इतिहासातील हा पहिला प्रयत्न आहे,’ असे अधिकृत संग्रह वर्णनात नमूद केले आहे. ‘याचा शोध एक महत्त्वपूर्ण यश, एक ‘क्वांटम लीप’ दर्शवतो, ज्याचे महत्त्व आणि अर्थ आजच्या काळात खूप खास आहे.’ ‘ला पास्कालाईन’ यापूर्वी ‘ख्रिस्तीज’च्या न्यूयॉर्क आणि हाँगकाँग येथील प्रदर्शनांमध्ये ठेवण्यात आले होते.

हे मशिन कॅटालोनियाचे दिवंगत संग्राहक लिओन पार्स यांच्या संग्रहालयाच्या लिलावामध्ये समाविष्ट होते. बुधवारी, पॅरिस प्रशासकीय न्यायालयाने फ्रान्सच्या संस्कृती मंत्र्यांनी मे महिन्यात दिलेले निर्यात प्रमाणपत्र तात्पुरते थांबवले. न्यायालयाने नोंदवले की, ‘ला पास्कालाईन’चे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक मूल्य पाहता ते ‘राष्ट्रीय खजिना’ म्हणून पात्र ठरू शकते, ज्यामुळे या मशिनला फ्रान्सच्या वारसा संहितेनुसार संरक्षण मिळू शकेल. फे्रंच वारसा समूह ‘असोसिएशन साइटस् अँड मॉन्युमेंटस्’ ने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT