1700-Year-Old Manuscript | नेदरलँडमधील ग्रंथालयात ‘ओडिसी’ महाकाव्याचा १७०० वर्षे जुना तुकडा 
विश्वसंचार

1700-Year-Old Manuscript | नेदरलँडमधील ग्रंथालयात ‘ओडिसी’ महाकाव्याचा १७०० वर्षे जुना तुकडा

पुढारी वृत्तसेवा

ॲम्स्टरडॅम : नेदरलँडमधील एका ग्रंथालयात जुन्या इजिप्शियन हस्तलिखितांचा अभ्यास करताना एका संशोधकाला प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या प्रसिद्ध ‘ओडिसी’ या महाकाव्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगाचा तुकडा सापडला आहे. हा तुकडा इसवी सन ३०० च्या सुमारास इजिप्तमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘पॉकेट एडिशन’ (लहान आकाराच्या आवृत्ती) मधील असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नेदरलँडमधील रॅडबाऊड युनिव्हर्सिटीचे ग्रीक साहित्याचे तज्ज्ञ आणि प्राध्यापक मार्क डी क्रिज हे सुरुवातीच्या ख्रिश्चन हस्तलिखितांचा अभ्यास करत होते. युट्रेक्ट युनिव्हर्सिटी ग्रंथालयाने २० व्या शतकाच्या मध्यात खरेदी केलेल्या हस्तलिखितांमध्ये त्यांना हा तुकडा सापडला. इजिप्शियन आणि ग्रीक हस्तलिखितांच्या संग्रहात सापडलेल्या या लहानशा पार्चमेंटवर (प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेला कागद) मार्क डी क्रिज यांना होमरच्या महाकाव्यातील ओळखीचे शब्द दिसून आले. युट्रेक्ट युनिव्हर्सिटीने जारी केलेल्या पत्रकानुसार, हा १७०० वर्षे जुना दस्तावेज प्राचीन काळातील पुस्तकांचे स्वरूप आणि प्रसार कसा होता, यावर नवीन प्रकाश टाकणारा ठरला आहे.

‘ओडिसी’चा हा नव्याने सापडलेला तुकडा केवळ २.६ बाय ३ इंच (६.६ बाय ७.७ सेंटिमीटर) आकाराचा असून, त्यात या महाकाव्यातील १२ व्या अध्यायातील (Book 12) काव्यपंक्ती आहेत. होमर या प्राचीन कवीचे ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ ही दोन महाकाव्ये पाश्चात्त्य जगतात प्रसिद्ध आहेत. हा नव्याने सापडलेला दस्तावेजाचा तुकडा बहुधा इसवी सनाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असून, इजिप्तमधील ‘फयुम’ या वाळवंटी हिरवळीच्या प्रदेशातील (ओॲसिस) एका कातडी हस्तलिखित ग्रंथाचा भाग असावा. पत्रकानुसार, आतापर्यंत अशा प्रकारचे केवळ ३० च्या आसपासच तुकडे जगभरात आढळले आहेत. ‘डच न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत डी क्रिज यांनी सांगितले की, हा तुकडा पॉकेट-साईझ ‘ओडिसी’च्या मध्यभागी असल्यामुळे आणि इतर पानांचे संरक्षण मिळाल्यामुळे इतकी वर्षे सुरक्षित राहू शकला असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT