170 Year Old Hanuman Idol | सगळे प्रयत्न करूनही हलली नाही १७० वर्षे जुनी हनुमान मूर्ती!  
विश्वसंचार

170 Year Old Hanuman Idol | सगळे प्रयत्न करूनही हलली नाही १७० वर्षे जुनी हनुमान मूर्ती!

पुढारी वृत्तसेवा

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सिंहस्थ २०२८ च्या तयारीसाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे खडे हनुमान मंदिराची सुमारे १७० वर्षे जुनी मूर्ती चर्चेत आली आहे. मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन आणि तज्ज्ञांनी हरेक प्रयत्न केले; मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करूनही मूर्ती जागेवरून इंचभरही हलली नाही. आता तिच्या पायाभागाची आणि आसपासच्या संरचनेची तांत्रिक तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, स्थानिक लोकांनी आता ही मूर्ती तेथून हटवण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

उज्जैनमधील कंठाल ते छत्री चौक (बडा सराफा) या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सिंहस्थ २०२८ च्या तयारीचा भाग म्हणून सुरू आहे. या मार्गावर खडे हनुमान मंदिर असल्याने रस्त्याच्या नियोजित कामात मूर्ती अडथळा ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे मूर्ती सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने मंदिराची बाहेरील संरचना हटवली आहे. मात्र, खडे हनुमानाची मूर्ती मूळ जागेवरच कायम आहे. गेल्या तीन दिवसांत अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञांनी काळजीपूर्वक प्रयत्न केले, तरी मूर्ती हलवण्यात यश आले नाही.

मूर्तीला कोणतीही हानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीचा पायाभाग नेमका कसा आहे, ती जमिनीत किती खोलवर स्थिर आहे आणि आसपासची माती व संरचना कशी आहे, याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी मूर्तीच्या आधाराजवळ सुमारे दीड फूट खोल खड्डा करण्यात आला आहे. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने स्कॅनिंग करण्याची तयारी आहे. मूर्ती हलवण्याचा पुढील प्रयत्न करण्यापूर्वी पुरातत्त्व तज्ज्ञांच्या टीमकडून मूर्तीचा आधार, अंतर्गत रचना आणि आजूबाजूची जमीन स्कॅन करण्यात येत आहे.

स्कॅनिंगमधून मिळणाऱ्या अहवालाच्या आधारे कोणत्या तंत्राने मूर्ती हलवता येईल, याचा निर्णय घेतला जाणार आहे. मूर्ती हलवण्याच्या प्रक्रियेला स्थानिक पुजारी, मंदिर समिती आणि काही हिंदू संघटनांसह भाविकांनी विरोध केला आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी मार्ग उपलब्ध असल्याने प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या आराखड्याचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मूर्ती अनेक प्रयत्नांनंतरही हलत नसल्याची बातमी पसरल्यानंतर स्थानिक भाविकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. काही भाविक आणि धार्मिक संघटनांकडून याकडे दैवी संकेत म्हणून पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT