नवी दिल्ली : आसामचा १७ वर्षीय तरुण रिकी सध्या त्याचा सर्वात खास आणि विश्वासू सोबती ‘पा’ (एक श्वान) याच्यासोबत सायकलवरून भारत भ्रमणावर निघाला आहे. नुकतेच या दोघांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर सायकलवरून जाताना पाहिले गेले. रिकी गेल्या ३० एप्रिल रोजी आसाममधून या प्रवासासाठी निघाला होता आणि नुकतीच केदारनाथची पायी/सायकल यात्रा पूर्ण करून तो परतत आहे. देशाला बस किंवा ट्रेनच्या खिडकीतून नव्हे, तर सायकलच्या सीटवर बसून अगदी जवळून अनुभवणे, हे रिकीचे स्वप्न आहे.
या संपूर्ण प्रवासाची सर्वात सुंदर आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे रिकीचा मुका मित्र ‘पा’. वर्ष २०२५ मध्ये बंगळूरच्या सायकल प्रवासादरम्यान रिकीला हा बेवारस कुत्रा सापडला होता. रिकीने त्याला आपल्यासोबत ठेवले आणि तेव्हापासून हे दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे पाठीराखे बनले आहेत. लांबचा प्रवास, ऊन, पाऊस, थकवा आणि प्रत्येक संकटात ‘पा’ नेहमी रिकीच्या सोबत असतो. ही अनोखी जोडी जिथे कुठे पोहोचते, तिथे लोकांचे लक्ष वेधून घेते. वाटेत जाणारे प्रवासी आवर्जून थांबून त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात आणि त्यांच्या या अतुट मैत्रीची गोष्ट जाणून घेतात. रात्रीच्या वेळी त्यांना थांबण्यासाठी मंदिरांमध्ये जागा मिळते, तर प्रवासात भेटणारे लोक जेवण आणि इतर मदत देऊन रिकीचा उत्साह वाढवतात. ‘कुटुंबाचा पाठिंबा आणि ‘पा’ची साथ यामुळेच हा खडतर प्रवास अतिशय संस्मरणीय आणि सुकर झाला आहे,’ असे रिकी अभिमानाने सांगतो.