Ancient Lamp Discovery | १,६०० वर्षे जुना पायाच्या आकाराचा दिवा सापडला 
विश्वसंचार

Ancient Lamp Discovery | १,६०० वर्षे जुना पायाच्या आकाराचा दिवा सापडला

ख्रिश्चन संस्कृतीतील गुप्त चिन्हांचा उलगडा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : प्राचीन बायझँटाईन साम्राज्यातील लोकांच्या कलाकुसरीचा एक अनोखा आणि दुर्मीळ नमुना समोर आला आहे. सुमारे १,६०० वर्षे जुना, मानवी उजव्या पायाच्या आकाराचा आणि चप्पल (सँडल) घातलेला एक कांस्याचा ऑईल लॅम्प (तेलाचा दिवा) सध्या संशोधकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा दिवा न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’मध्ये (द मेट) जतन करून ठेवण्यात आला असून, तो सुरुवातीच्या काळातील ख्रिश्चन धर्माचे एक महत्त्वाचे प्रतीक मानला जात आहे.

कलाकृतीची वैशिष्ट्ये आणि रचना

हा दिवा पाचव्या शतकात सध्याच्या सीरिया (तेव्हाचे बायझँटाईन साम्राज्य) भागात तयार करण्यात आला होता. हा दिवा मानवी पायाच्या खऱ्या आकारापेक्षा खूप लहान असून, त्याची लांबी केवळ ३.२५ इंच (८.३ सेमी) आहे. हा दिवा छताला किंवा भिंतीला टांगण्यासाठी त्याला १७ इंच लांब धातूची साखळी आणि आकडा (हूक) जोडलेला आहे. पायाच्या अंगठ्याजवळ दिव्याची वात ठेवण्यासाठी ‘न्हाळ’ बनवली आहे. टाचेच्या वरच्या बाजूला (घोट्यापाशी) तेल भरण्यासाठी एक छिद्र आहे, ज्याचे झाकण एका ‘क्रॉस’च्या आकाराचे आहे. हे चिन्ह हा दिवा ख्रिश्चन संस्कृतीचा भाग असल्याचे स्पष्ट करते. पायात घातलेल्या सँडलच्या तळव्यावर ‘स्वस्तिक’चे चिन्ह कोरलेले आहे. बायझँटाईन काळात याला ‘गॅमॅडिअन क्रॉस’ म्हटले जायचे आणि ते नशीब व समृद्धीचे प्रतीक मानले जायचे.

धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

‘द मेट’च्या मध्ययुगीन कला क्युरेटर वेरा ओस्टोइया यांच्या मते, प्राचीन काळी दिव्याचा प्रकाश केवळ अंधार दूर करण्यासाठी नव्हे, तर ‘अमरत्व आणि ज्ञानाचे’ प्रतीक म्हणून पाहिला जात असे. बायबलमधील स्तोत्रामध्ये एक प्रसिद्ध ओळ आहे, ‘‘तुझे वचन माझ्या पायांसाठी दिवा आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.’’ हा पायाच्या आकाराचा दिवा याच धार्मिक कल्पनेशी जोडलेला असावा, ज्याचा अर्थ देवाच्या मार्गावर चालणे असा होतो. याशिवाय, पायाचा आकार हा उत्तम आरोग्य, रोगमुक्ती आणि ख्रिश्चन धर्मयात्रेचे प्रतीकदेखील मानला जात असे. बायझँटाईन काळात वेगवेगळ्या आकाराचे दिवे बनवणे लोकप्रिय असले, तरी पायाच्या आकाराचा असा दिवा मिळणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT