जकार्ता : दक्षिण आशियातील समुद्रतळावरून मानवाच्या एक लुप्त झालेल्या पूर्वजाचे हाडांचे अवशेष सापडले असून, ते ‘होमो इरेक्टस’ या प्रजातीच्या एका नव्याने शोधलेल्या लोकसमूहाचे पुरावे आहेत, असे नव्या संशोधनांमधून निष्पन्न झाले आहे. हे लोक आधुनिक मानवांशी संपर्कात आले असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. ‘होमो इरेक्टस’ म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील असे पूर्वज, जे पाठीचा कणा ताठ ठेवून चालू शकत.
इंडोनेशियाच्या जावा बेटाजवळील समुद्रातील बांधकाम प्रकल्पादरम्यान सापडलेल्या 6,000 हून अधिक प्राण्यांच्या जीवाश्मांमध्ये ‘होमो इरेक्टस’ च्या हाडांचे तुकडे होते. ही पहिलीच वेळ होती की, इंडोनेशियातील सध्या बुडालेल्या भागांतून मानवाच्या जीवाश्मांचा शोध लागला. शोध लावलेला हा भाग प्राचीन काळी ‘बुडालेले सुंदालँड‘ म्हणून ओळखला जात होता. सुमारे 1,40,000 वर्षांपूर्वी, हिमयुगात जेव्हा समुद्रपातळी खालावली होती, तेव्हा जावा आणि आशियाई खंडभूमी एकमेकांशी जोडले गेले होते. हे विशाल मैदाने आणि नद्या असलेले प्रदेश होते.
नव्याने सापडलेल्या जीवाश्मांवरून हे स्पष्ट झाले की, त्या भागात मासे, कासव, पाणघोडे तसेच हत्ती, स्टेगोडॉन व म्हशी यांसारख्या स्थलीय प्राण्यांची वस्ती होती. या भागात होमो इरेक्टस राहत होते आणि त्यांनी या सृष्टीचा वापर शिकारीसाठी केला होता, हे पुरावे प्रथमच मिळाले. मदुरा स्ट्रेट नावाच्या आता जलमय झालेल्या दरीत सापडलेल्या जीवाश्मांवर शस्त्राने केलेल्या कापांच्या खुणा आढळल्या. विशेषतः कासवांवर, जे दक्षिण-आशियात अशा प्रकारच्या शिकारीचा सगळ्यात जुना पुरावा मानला जातो. विशेष म्हणजे, होमो इरेक्टस यांनी प्रजननक्षम वयात असलेल्या बोविड (गुरांसारखे प्राणी) यांना लक्ष्य केले होते.
ही रणनीती होमो सेपियन्स (आपल्या प्रजातीतील) लोक वापरत असत. त्यामुळे एक शक्यता अशी मांडली गेली आहे की, या होमो इरेक्टस लोकांनी इतर मानव प्रजातींकडून शिकारी तंत्र शिकलं असावं. अभ्यासाचे प्रमुख लेखक व नेदरलँड्सच्या लिडेन युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञ हेरोल्ड बर्गहुइस म्हणाले, ‘ही शिकारी पद्धत होमो इरेक्टसने स्वतंत्रपणे विकसित केली असावी; पण अशीही शक्यता आहे की ते इतर मानव वंशांशी संपर्कात आले असावेत.’ हे निष्कर्ष Quaternary Environments and Human या जर्नलमध्ये मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या चार स्वतंत्र अभ्यासांतून मांडण्यात आले आहेत.
होमो इरेक्टस हा मानवाच्या उत्क्रांतीत अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता, तो सुमारे 2 दशलक्ष वर्षांपूर्वी उगम पावला आणि आफ्रिकेबाहेर स्थलांतर करणारा पहिला मानव वंश होता. जावा बेटावर ही प्रजाती 1,17,000 ते 1,08,000 वर्षांपूर्वीपर्यंत जिवंत होती, आणि होमो सेपियन्सने सुमारे 77,000 वर्षांपूर्वी दक्षिण-आशियात प्रवेश केला. दक्षिण-आशियातील मानववंशवृक्ष अतिशय गुंतागुंतीचा आहे. होमो इरेक्टस, डेनिसोवन्स, निएंडरथल्स आणि होमो सेपियन्स हे सर्व वंश कोणत्या पद्धतीने आणि कितपत परस्पर संपर्कात होते, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, मदुरा स्ट्रेटमधील हे नवे जीवाश्म या रहस्यांना उजेडात आणण्यास मदत करतील, असा संशोधकांचा विश्वास आहे.