लंडन : नवीन संशोधनानुसार, आतापर्यंत सापडलेली सर्वात जुनी मानव-निर्मित हाडांची साधने किंवा अवजारे सुमारे 1.5 दशलक्ष वर्षे जुनी आहेत. हा शोध आपल्या पूर्वजांची बुद्धिमत्ता आणि तांत्रिक कौशल्य पूर्वीच्या मान्यतेपेक्षा अधिक प्रगत होते, असे सूचित करतो. ही हाडांची अवजारे टांझानियामधील ओल्डुवाई गॉर्ज येथे सापडली असून, ती हिप्पो आणि हत्तींच्या पायांच्या हाडांपासून बनवलेली आहेत. ही साधने यापूर्वी आढळलेल्या हाडांच्या उपकरणांपेक्षा 10 लाख वर्षांनी अधिक जुनी आहेत.
या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि स्पॅनिश नॅशनल रिसर्च कौन्सिलच्या सेंटर फॉर ह्युमन अँड सोशल सायन्सेस येथील पुरातत्त्वशास्त्रज्ञ इग्नासिओ दे ला टोरे म्हणतात, ‘या साधनांची निर्मिती करणार्या होमिनिन्सनी (पूर्वज मानवांनी) आपले दगडी साधन बनवण्याचे ज्ञान हाडांवरही लागू केले.’ हा शोध त्यावेळच्या मानवांचे संज्ञानशक्तीतील मोठे प्रगतिपथ दर्शवतो. संशोधकांनी 27 हाडांचे तुकडे तपासले, जे विशेष प्रकारच्या प्रक्रियेमुळे तयार केले गेले होते. या प्रक्रियेस ‘नॅपिंग’ असे म्हणतात, ज्यामध्ये मोठ्या दगडाच्या साहाय्याने लहान दगडाचे तुकडे फोडले जातात, जेणेकरून त्याला धार येईल. हीच प्रक्रिया हाडांसाठीही वापरली गेली होती. आफ्रिकेमध्ये 3.3 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून दगडी साधने वापरल्याचे पुरावे सापडले आहेत, पण हाडांपासून तयार केलेली साधने फारच कमी आढळली आहेत. हाडे नैसर्गिकरित्या लवकर नष्ट होतात, त्यामुळे त्यांचे जीवाश्म होण्याची शक्यता कमी असते. मात्र, हे हाडांचे तुकडे जमिनीत झपाट्याने गाडले गेले असावेत, त्यामुळे ते टिकून राहिले. संशोधकांनी या हाडांच्या साधनांचा अधिक बारकाईने अभ्यास केला असता, प्राण्यांच्या शिकारीमुळे नव्हे, तर होमिनिन्सनी जाणीवपूर्वक ही हाडे कोरली आहेत, हे स्पष्ट झाले. ही साधने नेमकी कोणत्या मानवपूर्वजांनी तयार केली, हे निश्चित झालेले नाही. 1.5 दशलक्ष वर्षांपूर्वी ओल्डुवाई गॉर्ज परिसरात होमो इरेक्टस (पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारे मानव पूर्वज) आणि ’पॅरांथ्राेपस बोईसेई’ (या प्रजातीचा मानव होमो इरेक्टसच्या समकालीन होता, पण हा आधुनिक मानवाचा थेट पूर्वज नव्हता. त्याऐवजी, तो ‘रोबस्ट ऑस्ट्रॅलोपिथेसिन’ गटाचा एक भाग मानला जातो, जो काही काळानंतर नामशेष झाला.) हे दोन्ही होमिनिन्स अस्तित्वात होते. त्यामुळे ही साधने त्यांच्यापैकी कोणी बनवली याचा अजून शोध घेतला जात आहे.